स्मार्ट सिटीचे 'काउंटडाउन' सुरू; ३१ मे ची डेडलाइन गाठणे तूर्त अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 07:22 AM2024-05-30T07:22:33+5:302024-05-30T07:23:19+5:30
काही रस्ते केले खुले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होण्यासाठी ३१ मे ही डेडलाइन पूर्ण होण्यास केवळ दोन दिवस बाकी आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण होणे असल्याने ही डेडलाइन गाठणे आता अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वुडलैंड शोरूम ते गीता बेकरी, सरकारी प्रिंटिंग प्रेसपर्यंत जाणारा रस्ता, तसेच सांतिनेझ येथील शीतल हॉटेल ते काकुलो जंक्शनपर्यंत जाणारा रस्ता, महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. मात्र, बहुतेक रस्त्यांची कामे सुरूच असल्याने लोकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पणजी, रायबंदर भागातील या स्मार्ट सिटीच्या कामांवर १ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. दोन वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. मागील वर्षी जी २० परिषदेवेळी कामे काही दिवस बंद ठेवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले होते.
परिषद संपल्यानंतर रस्ते पुन्हा फोडले. या कामांमुळे धूळ प्रदूषण होते ते वेगळेच? त्यामुळे नक्की ही कामे संपणार तरी कधी ? असा प्रश्न पणजीवासीयांना पडला आहे. दुकानदारांचाही व्यवसाय बुडाला आहे. रस्ते फोडल्याने वाहन पार्किंगचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे दुकानदारांचा व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून बुडाला आहे.
तीन वर्षापासून काम सुरु तरीही...
काकुलो मॉल समोरील रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू असल्याने तेथील वाहतूक बंद आहे. याशिवाय पणजीतील अन्यही काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्ते वाहतुकीसाठी खुले केले, तरीही रस्त्यांच्या कडेला कामे सुरूच आहेत.
डांबरीकरणाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह
रस्त्यांचे डांबरीकरण केले, तरीही ते पावसाळ्यात किती टिकाव धरतील याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत काऊंटडाऊन सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र ३१ मे पर्यंतची डेडलाइन गाठता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पाउस सुरू झाल्यानंतर कामांची गती मंदावणार आहे.