नऊ वर्षांच्या वेदनेवर न्यायालयाची फुंकर; वृंदा नाईकच्या कुटुंबीयांना २४ लाखांची भरपाई देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 08:50 AM2023-11-03T08:50:28+5:302023-11-03T08:51:56+5:30

याचिका २०१५ मध्ये सादर केली होती. तेव्हापासून ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे.

court order to pay compensation of 24 lakhs to the family of vrunda naik | नऊ वर्षांच्या वेदनेवर न्यायालयाची फुंकर; वृंदा नाईकच्या कुटुंबीयांना २४ लाखांची भरपाई देण्याचा आदेश

नऊ वर्षांच्या वेदनेवर न्यायालयाची फुंकर; वृंदा नाईकच्या कुटुंबीयांना २४ लाखांची भरपाई देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बसने कॉलेजमध्ये जाण्यासाठी आलेल्या १६ वर्षीय वृंदा नाईक या विद्यार्थिनीला निष्काळजीपणे भरधाव जीप चालवून जीव घेणाऱ्या जीपमालक आणि विमा कंपनीने तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश फोंडा वाहन अपघात दावे लवादाने दिला आहे. पीडितेच्या कुटुंबाला २३.८५ लाख रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या या भीषण अपघातात बोलेरो जीपने प्रचंड वेगात वृंदाला ठोकर देऊन जवळपास २० मीटरपर्यंत फरफटत नेले होते. शिक्षणात आणि सहशालेय उपक्रमात हुशार असलेली वृंदा आज असती तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार बनली असती. पीईएस महाविद्यालयात शिकणारी वृंदा ही अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे ती चांगली करिअर घडवू शकली असती. त्यामुळे तिचे आणि कुटुंबाचे नुकसान केल्याचा दावा करून पीडितेच्या कुटुंबीयांनी मोटर अपघात याचिका लवादापुढे सादर केली. यावर सुनावणीनंतर लवादाने निवाडा सुनावला.

जीप चालक आणि मालक बाबाजी धोंडिराम शेळके यांच्यातर्फे युक्तिवाद करताना याचिकादाराचे युक्तिवाद अमान्य केले. जेथे अपघात झाला, तिथे झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याचा दावा चुकीचा असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, याचिकादारांकडील साक्षीमुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या. एक म्हणजे वृंदा हिने जवळजवळ रस्ता ओलांडला होता. दुसरी गोष्ट म्हणजे बोलेरो जीप प्रचंड वेगात असल्यामुळे जीपने रस्त्याच्या चुकीच्या बाजूला जाऊन वृंदाला ठोकर दिली.

वस्तुस्थिती सिद्ध

साक्षीदारांच्या साक्षीमुळे वस्तुस्थिती सिद्ध झाली आणि वृंदाच्या कुटुंबीयांची याचिका लवादाने मंजूर केली. परंतु, ३५.०५ लाख रुपयांऐवजी २३.८५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही भरपाई बोलेरो जीपचे मालक आणि विमा कंपनीला संयुक्तपणे देण्यास सांगितले आहे. याचिका २०१५ मध्ये सादर केली होती. तेव्हापासून ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे.

 

Web Title: court order to pay compensation of 24 lakhs to the family of vrunda naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा