कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
By admin | Published: September 18, 2016 04:35 AM2016-09-18T04:35:02+5:302016-09-18T04:35:02+5:30
भारतीय जनता पार्टीचेच युती सरकार २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारावर येईल.
पणजी : भारतीय जनता पार्टीचेच युती सरकार २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारावर येईल. मातृभाषेचे आम्ही खुनी नव्हे. कावळ््याच्या शापाने गाय मरत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंच व सुभाष वेलिंगकर यांचे नाव न घेता निशाणा साधला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही, आपण सहा महिने कळ सोसली; पण निवडणुकीवेळी योग्य ते उत्तर देईन, असा इशारा वेलिंगकर यांना दिला.
भाजपाच्या सुमारे सहाशे कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात पार पडली. पर्रीकर, पार्सेकर यांच्यासह भाजपाचे सगळे मंत्री, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाषा सुरक्षा मंचला कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला. पर्रीकर खोटारडे व विश्वासघातकी तर पार्सेकर चांगले, असे विधान काहीजण (वेलिंगकर यांचे नाव घेतले नाही) करून आपल्यात व पर्रीकर यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जावे व या अपप्रचारास जोरदार उत्तर द्यावे, असे आवाहन पार्सेकर यांनी केले. आता आम्ही बोलणारच. आता आमच्या टीकाकाराकडे कवचकुंडले (वेलिंगकरांकडे संघचालकपद) राहिलेली नाहीत. मातृभाषेतूनच मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हायला हवे, हे आम्हीही मान्य केले आहे. ९३ मराठी-कोकणी शाळांना आम्ही परवानगी दिली, असे पार्सेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)