गोव्यात भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, फाइल अडविल्यास व्हाट्सअपवर करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 09:22 PM2022-10-31T21:22:51+5:302022-10-31T21:22:58+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून क्रमांक जाहीर
पणजी : सरकारी कार्यालयात कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने फाइल अडविल्यास तसेच भ्रष्टाचारासाठी सतावणूक होत असल्यास संबंधित कर्मचारी तसेच खात्याविरुद्ध सार्वजनिक गाऱ्हाणी विभागाकडे आता थेट व्हाट्सअपवर अथवा ईमेलवर किंवा कॉल करूनही तक्रार करता येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी व्हाट्सअप क्रमांकही जाहीर केला आहे.
सार्वजनिक गाऱ्हाणी विभाग सरकारने सक्रिय केला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षता सप्ताहाच्या कार्यक्रमात कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांच्या काळात या विभागाकडे ३0६ तक्रारी आल्या आणि त्यातील ७0 टक्के तक्रारींना न्याय देऊन आम्ही त्या सोडविल्या. कुठल्याही सरकारी कार्यालयात शासकीय कामाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांकडून गैरवागणूक मिळाल्यास अथवा कोणी पैसे मागत असल्यास पणजी येथे उद्योग भवनात वरील विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार सादर करण्याची सोय आहे. आता या व्यतिरिक्त 8956642400 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा 9319334335 या क्रमांकावर कॉल करून तक्रार करता येईल. या विभागाकडे तक्रार आल्यानंतर ती संबंधित खातेप्रमुखाकडे पुढील कारवाईसाठी पाठवली जाईल.
आठ ते नऊ अधिकाऱ्यांना निलंबित केले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्यांना गैरवागणूक देणाऱ्या किंवा भ्रष्टाचारासाठी सतावणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. माज्या चार वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मी आठ ते नऊ अधिकाऱ्यांना निलंबित केले. दहा ते बारा अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. मुख्यमंत्री म्हणाले की, काही वेळा निलंबनाची कारवाई करताना मला वाईट वाटते परंतु खात्यामध्ये शिस्त आणण्यासाठी अशी कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.