परप्रांतीयांमध्ये बोगस ओबीसींची निर्मिती, भंडारी समाजाकडून आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 08:28 PM2019-07-08T20:28:22+5:302019-07-08T20:29:48+5:30
परप्रांतीय मजुर येतात आणि येथे ते आपले आडनाव बदलून घेतात व ओबीसी बनतात.
पणजी - परप्रांतीय मजुर गोव्यात येतात आणि येथे ते आपले आडनाव नाईक असे बदलून घेतात व ओबीसी बनतात. या गंभीर प्रकाराला आक्षेप घेणारे निवेदन गोमंतक भंडारी समाजाने सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले. तसेच आडनावे अशी बदलण्याच्या प्रकाराला समाजाने तीव्र आक्षेप घेतला व मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून कायदा दुरुस्त करावा अशी मागणी केली.
राज्यातील तीन तालुक्यांमध्ये अलिकडे असे मोठय़ा प्रमाणात आढळून येते की, या तीन तालुक्यांमध्ये येणारे परप्रांतीय मजुर येथे कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी आडनावे बदलतात. बहुतांश लोक नाईक असे आपले आडनाव बदलून घेतात. हे लोक मग व्यवसायिक शिक्षण, सरकारी नोक-या यात असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी भंडारी म्हणून किंवा ओबीसी म्हणून प्रमाणपत्रही प्राप्त करतात. हा प्रकार आता खूप व्यापक व खूप गंभीर वळणावर पोहचल्याने भंडारी समाजाने सरकारचे लक्ष याकडे वेधले असल्याचे दिसून आले.
समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, ज्येष्ठ पदाधिकारी देवानंद नाईक तसेच दत्तप्रसाद नाईक, महानंद अस्नोडकर, किशोर अस्नोडकर, दयानंद मांद्रेकर आदींनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 1990 सालचा द गोवा चेंज ऑफ नेम्स अॅण्ड सरनेम्स हा कायदा दुरुस्त केला जावा, अशी मागणी समाजाने निवेदनातून केली आहे. परप्रांतांमध्ये ज्या मजुरांचा जन्म झाला, त्यांची नावे बदलण्यास नव्या दुरुस्तीद्वारे प्रतिबंध करावा, अशी मागणी समाजाने केली आहे.
बार्देश, मुरगाव आणि सासष्टी या तीन तालुक्यांमध्ये आडनावे बदलण्याचे प्रकार जास्त घडतात. जर कुणीही परप्रांतीय आपले आडनाव नाईक असे बदलून घेण्यासाठी अर्ज घेऊन आले तर सरकारी खात्याने ते नाव गोमंतक भंडारी समाजाला कळवावे. गोमंतक भंडारी समाज बांधवांच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जायलाच हवी, अशी मागणी समाजाने केली आहे.