सहकारी पतसंस्था रडारवर; १३ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:15 PM2023-08-03T13:15:59+5:302023-08-03T13:17:04+5:30
सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः राज्यात सुमारे १२५ सहकारी पतसंस्था आहेत. या पतसंस्थांमध्ये गोमंतकियांच्या तब्बल १२ हजार कोटी रुपये ठेवी आहेत. अनेक पतसंस्था १७ ते २० टक्क्यांपर्यंत भरमसाट व्याज कर्जावर आकारतात, हे प्रकार बंद केले जातील. १३ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज आकारणाऱ्या पतसंस्थांवर कठोर कारवाईचा इशारा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला.
सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, तब्बल १०० सहकारी संस्था ५००० कुटुंबांना सांभाळत आहेत. सहकारी पतसंस्थांचे दरवर्षी ऑडिट केले जाईल. सहकारी बँकांची कर्जे थकता कामा नयेत. बिगर उत्पादक मालमत्तेत वाढ होता कामा नये, याची काळजी घेतली जाईल.
९४ पतसंस्थांवर प्रशासक
सहकारी पतसंस्थांचे पूर्णपणे संगणकीकरण केले जाईल. सध्या ९४ संस्थांवर प्रशासन नेमलेले आहेत. सहा सहकारी संस्था विसर्जित केलेल्या आहेत. व्हिजनरी सहकारी पतसंस्थेच्या बाबतीत चौकशी चालू आहे. माशेल महिला सहकारी पतसंस्थेकडून दोन ते तीन कोटी रुपये वसूल केलेले आहेत, अशी माहितीही मंत्री शिरोडकर यांनी दिली.
चढ्या दराने दूध खरेदीची चौकशी करू
गोवा डेअरी शेजारी राज्यातून चढ्या दराने दूध खरेदी करीत असल्याच्या प्रकाराची चौकशी केली जाईल. राज्यात आतापर्यंत सहा पतसंस्थांवर कारवाई केलेली असून, संचालकांना अपात्र ठरविलेले आहे. यापुढे त्यांना सहकार क्षेत्रात निवडणूक लढवता येणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले.
विरोधी आमदारांनी गोवा डेअरीतील घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. शेजारी राज्यातून चढ्या दराने दूध खरेदी केले जात आहे, याकडे लक्ष वेधले होते. मंत्री शिरोडकर म्हणाले की, डेअरीतील सर्व गैरप्रकार बंद करू व डेअरी नफ्यात आणू तसेच पशुखाद्य प्रकल्प लवकरच पशुसंवर्धन खात्याकडे सुपूर्द केला जाईल. त्या खात्याने लिलाव करावा आणि गोवा डेअरीला माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करावे, असा प्रस्ताव आहे. गोवा डेअरीला दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे सन्मानाने मिळायला हवेत. गोवा डेअरी मजबूत व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
गोवा डेअरी परराज्यातील एका दूध कंपनीकडून दररोज पंधरा ते वीस हजार लिटर दूध लिटरमागे पाच रुपये चढ्या दराने विकत घेत आहे व त्याबद्दल सहकार निबंधकांकडे तक्रारही दिलेली आहे, असे विजय सरदेसाई यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते.
प्रशासक नेमले; प्रकल्प बंद पडले
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, प्रशासक नेमल्यानंतर गोवा डेअरीचा आइस्क्रीम प्रकल्प, पशुखाद्य प्रकल्प बंद पडलेला आहे. गोवा बागायतदारसारख्या अवघ्याच काही सहकारी संस्था यशस्वी झालेल्या आहेत. गृहनिर्माण सहकारी संस्थांचा अधिक भरणा दिसतो. १४५२ गृहनिर्माण सहकारी संस्था राज्यात आहेत. हे खाते कालांतराने गृहनिर्माण सहकारी संस्थांचेच बनणार आहे, अशी टीकाही युरी यांनी केली.