खेड्यातील क्रिकेटप्रेमींनी खेळाला प्राधान्य देऊन नावलौकिक प्राप्त केला: उर्जामंत्री सुदिन ढवळीकर
By आप्पा बुवा | Published: August 18, 2023 07:22 PM2023-08-18T19:22:23+5:302023-08-18T19:22:48+5:30
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात खेळाच्या पायाभूत सुविधा कमी राहिल्या. आता परिस्थिती खूप बदलली आहे, खेड्यापाड्यातील तरुण खेळासाठी उत्सुक आहेत.
फोंडा- राज्यातील विविध खेळांच्या वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मडकई मतदारसंघात सुविधा उभारण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत ज्यामध्ये विविध खेळ खेळता येतील. जुन्या काळी आर्थिक चणचण असून सुद्धा खेड्यातील क्रिकेटप्रेमींनी खेळाला प्राधान्य देऊन नावलौकिक प्राप्त केला, असे प्रतिपादन उर्जामंत्री श्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
कुंडईम क्रिकेटर्स क्लब, कुंडई क्लब हाऊसचा रौप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संजय कामत आणि संतोष एम. नाईक जीवनगौरव पुरस्कार, तसेच क्रीडा क्षेत्रात विशेषत: क्रिकेट क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या खेळांडूचा गौरव केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुंडईचे सरपंच सर्वेश जल्मी, उद्योजक सुभाष महानंदू नाईक, रणजी क्रिकेट खेळाडू अवधूत आमोणकर, रोबीन डिसोझा, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नागेश फडते, कुंडई क्लबचे अध्यक्ष प्रमोद फडते उपस्थित होते.
ढवळीकर पुढे बोलताना म्हणाले की, खेळामुळे समकालीन लोकांमध्ये एक बंध निर्माण होतो जो आयुष्यभर टिकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात खेळाच्या पायाभूत सुविधा कमी राहिल्या. आता परिस्थिती खूप बदलली आहे, खेड्यापाड्यातील तरुण खेळासाठी उत्सुक आहेत. तसेच शासनाकडून खेळांसाठी विविध सुविधा व पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. 2002 नंतर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडले.
खेळांना चालना देण्यासाठी मी स्पोर्ट्स क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आणि 1984 च्या काळात आठ स्पोर्ट्स क्लब सुरू केले. आता मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून लोक खेळासाठी प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.'मेरी माटी मेरा देश' सामाजिक सलोखा, ऐक्य आणि आजूबाजूच्या लोकांचे कल्याण प्रतिबिंबित करते. संयुक्त कुटुंब पद्धतीच्या संस्कृतीत ही कल्पना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धतीत सामाजिक मूल्यांचा प्रसार केल्यास राष्ट्राची एकात्मता निर्माण होऊ शकते.
यावेळी बोलताना डॉ घनःश्याम मार्दोळकर यांनी गावाच्या सामाजिक विकासासाठी एकत्र काम केल्याबद्दल त्यांनी कुंडईतील लोकांचे कौतुक केले. गावकऱ्यांनी नेहमीच सांघिक कार्य, एकता आणि सामाजिक एकोपा जपला आहे जो गावातील प्रत्येक सामाजिक मेळाव्यात दिसून येतो. संतोष नाईक यांनी युवकांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली. खेळांच्या प्रचारासाठी पैसा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.विरेश कामत यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन सुरलकर यांनी केले.