गोव्यात एकाच रात्रीत तब्बल ४२५ मद्यपी चालकांविरुध्द गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 09:19 PM2018-09-30T21:19:37+5:302018-09-30T21:21:35+5:30
आतापर्यंत १२७ चालकांना दहा दिवसांपर्यंत कैद
पणजी : शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांच्या केलेल्या तपासणीत ४२५ जणांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. रात्री ९ वाजल्यापासून राज्यात ठिकठिकाणी पोलिसांनी ही आकस्मिक तपासणी केली. मद्यप्राशन करुन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यात आतापर्यंत १२७ चालकांना दहा दिवसांपर्यंत कैदही झालेली आहे.
अधिकृत माहितीनुसार शनिवारी २९ सप्टेंबरपर्यंत एकूण ४५५२ मद्यपी चालकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे नोंदविले गेले आहेत. अशा प्रकारची पोलिसांनी उघडलेली ही तिसरी मोहीम आहे. वाहतूक नियम उल्लंघनाच्या या सर्व प्रकरणांमध्ये दस्तऐवज तसेच वाहने जप्त करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाने २00 मिलिग्रॅम किंवा १00 मिलिलिटरपेक्षा जास्त मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास पोलिस निरीक्षक हुद्यावरील अधिकारी स्वत: सुनावणीच्यावेळी कोर्टात हजर राहतो आणि संबंधित चालकाला जास्तीत जास्त शिक्षा केली जावी तसेच त्यावा परवाना निलंबित केला जावा, अशी मागणी करतो. अशा अनेक प्रकरणांमध्ये दंडही ठोठावण्यात आलेला आहे आणि कैदेची शिक्षाही झालेली आहे.
गोवा वाहतूक पोलिसांनी अलीकडेच मद्यपी चालकांबरोबरच वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर, सिग्नल तोडणे, फॅन्सी नंबरप्लेट, अल्पवयीन वाहनचालक, काळ्या काचा, विना परवाना वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे आदी प्रकरणी गुन्ह्यांबाबत वाहतूक पोलिसांनी कडक धोरण अवलंबिले आहे.