वृद्ध मातेला घरात राहायला न देणाऱ्या मुलावर व सुनेवर गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:23 PM2020-01-16T14:23:42+5:302020-01-16T14:23:48+5:30
73 वर्षीय वृद्ध आईला घरात राहू न देणा-या व तिला धमकी देणा-या मुलावर व सुनेवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मडगाव: 73 वर्षीय वृद्ध आईला घरात राहू न देणा-या व तिला धमकी देणा-या मुलावर व सुनेवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदाफोळ-चिंचणी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी क्लिोंटोनिवो पिंटो व त्याची पत्नी इल्डा अविता डिसोझा या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेच्या ३४१ , ५0४ , ५0६ तसेच कलम २४ पालक व ज्येष्ठ नागरिकाची निगराणी व काळजी कायदा २00७ अंतर्गंत संशयितांवर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काल बुधवारी महिला प्रदेश काँग्रेसने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित ज्येष्ठ महिला नागरिकावर होणा-या अत्याचाराला वाचा फोडली होती. संशयितांवर दखल पात्र गुन्हा नोंद करून कारवाईची मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली होती. यावेळी मडगाव पोलीस विभागाचे उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी यासंबंधी रितसर तक्रार करा, संशयितावर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.
फिलोमिना पिंटो या विधवा असून, तिचा मुलगा तिला घरात वास्तव करायला देत नसल्याने ती आपल्या मुलीकडे तसेच सुनेकडे राहात होती. आपल्या नव-याच्या मालकीच्या घरात राहायला मिळावा यासाठी पिंटो यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. न्यायालयाने तिला त्या घरात राहायला कुणी अटकाव करू नये, असा आदेशही दिला होता. मंगळवारी तिला पुन्हा क्लिटोनिवो याने घरातून बाहेर काढले होते, दरवाज्याला कडी लावली होती. तक्रारदाराला अटकाव करून धमकी दिल्याचाही संशयितांवर आरोप आहे. कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेरन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहा सावळ पुढील तपास करीत आहेत.