मेघनाला क्राइम ब्रँचची नोटीस; मातेसह मुलींना वैद्यकीय तपासणीस सहकार्य करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:23 AM2023-08-22T11:23:09+5:302023-08-22T11:24:19+5:30

मेघना हिच्याबरोबर तिच्या मुलांचीही वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

crime branch notice to meghna savardekar and instructions to girls along with mother to cooperate in medical examination | मेघनाला क्राइम ब्रँचची नोटीस; मातेसह मुलींना वैद्यकीय तपासणीस सहकार्य करण्याची सूचना

मेघनाला क्राइम ब्रँचची नोटीस; मातेसह मुलींना वैद्यकीय तपासणीस सहकार्य करण्याची सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बाणस्तरी येथील भीषण अपघातप्रकरणी अटकेत असलेल्या परेश सिनाय सावर्डेकर याची पत्नी मेघना हिची आणि त्यांच्या तिन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज क्राइम ब्रँचने व्यक्त केली आहे. त्यासाठी क्राइम ब्रँचने त्यांना नोटीसही पाठविली आहे.

६ ऑगस्ट रोजी झालेले बाणस्तरी अपघात प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राइम ब्रँचकडे गेल्यानंतर, तपासाने गती घेतल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी परेशला अटक केली असली, तरी संशयाची सुई मेघनावरही वळली असल्याने, तीही पोलिसांच्या स्कॅनरवर आली आहे. पोलिसांना तिची वैद्यकीय तपासणी हवी आहे. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी तिला वैद्यकीय चाचणीसाठी सहकार्य करण्याची सूचना देणारी नोटीस पाठविली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिने वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य करणार असल्याचे पोलिसांना कळविले आहे. मात्र, पोलिसांना ही तपासणी आज, मंगळवारीच करायची आहे.

मुलांचीही तपासणी

अपघाताला अडीच आठवडे उलटून गेल्यानंतर पोलिसांना मेघनाची वैद्यकीय तपासणी नेमकी कशासाठी, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अपघाताच्या वेळी कोण, कुठे बसले होते, याचा छडाही वैद्यकीय तपासणीतून करता येतो. मात्र, अडीच आठवडे उलटून गेल्यानंतरही ते शक्य आहे का? याबद्दल शंका व्यक्त केल्या जातात. निदान त्या दृष्टीने प्रयत्न करून पाहण्यास काय हरकत आहे, असा सल्ला तपास पथकाला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मेघना हिच्याबरोबर तिच्या मुलांचीही वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मेघना संशयाच्या घेऱ्यात

अपघात प्रकरणात परेशला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली असतानाही क्राइम ब्रँचच्या तपासाचा रोख मेघना हिच्या दिशेने वळत असल्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत समोर न आलेली वस्तुस्थिती उजेडात येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. परेश मर्सिडिस चालवित होता, असे जर सावर्डेकर कुटुंबीय दावा करतात, तर या प्रकरणात परेशला अटक केल्यानंतरही मेघनाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेणे हा आश्चर्यचकीत करणारा प्रकार आहे. कारण अपघाताच्या गुन्ह्यात चालकाशिवाय कुणालाही अटक केली जात नाही. म्हार्दोळ पोलिसांनी पाठविलेल्या एकाही समन्सला मेघनाने जुमानले नाही. उलट समन्सना न्यायालयात आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अपघातस्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मेघना ड्रायव्हर सीटवर असल्याची जबानी पोलिसांना दिली आहे.

एअरबॅग जप्त

दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज गाडीची एअरबॅग जप्त केली आहे. त्यावर रक्ताचे डाग आहेत का ? याची पडताळणी केली जात आहे. सावर्डेकर कुटुंबाची ही मर्सिडीज गाडी २०१६ मॉडेलची आहे. महत्त्वाचे म्हणजे वाहनाचे स्पीड तपासण्याची यंत्रणा या वाहनात नाही. त्यामुळे अपघातावेळी गाडीचा वेग किती होता ? हे शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

तीन तास नोंदवला जबाब

फोंडा : बाणस्तारी अपघातप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मेघना परेश सावर्डेकर सोमवारी (दि. २१) जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाली. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मेघना हिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. सुमारे तीन तास हा बाब नोंदवण्यात आला. बाणस्तारी येथे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अपघात घडला त्या दिवशी गाडी नक्की कोण चालवत होते, गेल्या काही दिवसांपासून याबाबत दावे-प्रतिदावे सुरु आहेत. बाणस्तारी येथील नागरिक आणि दिवाडीतील नागरिकांनी मेघना सावर्डेकर हिला अटक करण्याची मागणी केली होती. मेघनाने सातत्याने अटक चुकविण्यासाठी आटापिटा केला. अखेर सोमवारी ती न्याय दंडाधिकाच्यांसमोर हजर झाली. यावेळी न्यायालयाच्या आवारात लोकांची गर्दी झाली होती.

परेश कोठडीतच : जामीन सुनावणी २४ पर्यंत तहकूब

पणजी : बाणस्ता अपघाताला कारणीभूत ठरलेला वाहनचालक परेश सावर्डेकर याने दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारपर्यंत (दि. २४ ऑगस्ट) तहकूब केली आहे. त्यामुळे परेश याला सध्या कोठडीत राहावे लागणार आहे. दरम्यान, परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिचा फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सोमवारी (दि. २१) जबाब नोंदविण्यात आला. अन्य दोघांचे जबाब बुधवारी (दि. २३) नोंदविले जाणार आहेत. या प्रकरणाशी संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर परेशच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात केली होती. त्यानुसार गुरुवारपर्यंत सुनावणी तहकूब केली. ६ ऑगस्ट रोजी बाणास्तरी येथे अपघात झाला होता. भरधाव मर्सिडीज कारने दिलेल्या धडकेत तिघेजण ठार झाले होते. ज्यावेळी अपघात झाला, तेव्हा कार परेश नव्हे तर पत्नी मेघना चालवत होती, असा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला. फोंडा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने परेशने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

Web Title: crime branch notice to meghna savardekar and instructions to girls along with mother to cooperate in medical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा