मेघनाच्या जामिनाला क्राइम ब्रँच देणार आव्हान; चालकाचा शोध घेणारी पुराव्यांची शोधाशोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:03 AM2023-08-28T09:03:31+5:302023-08-28T09:04:38+5:30
क्राइम ब्रँच अटकपूर्व जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बाणस्तरी अपघात प्रकरणात मर्सिडीसची मालक मेघना सिनाय - सावर्डेकर हिला फोंडा न्यायालाने सत्र अटकपूर्व जामीन दिला आहे. मात्र, ही लढाई अजून संपली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. क्राइम ब्रँच अटकपूर्व जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे.
क्राइम ब्रँचमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फोंडा सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. या सल्ल्याची अंमलबजावणीही होणार आहे. याबाबत आव्हान याचिका दाखल केली जाणार आहे. त्यामुळे मिळविलेला अटकपूर्व जामीन टिकवून धरण्यासाठी आता मेघनाला आणखी एक लढाई लढावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
क्राइम ब्रँचकडे नवीन पुरावा
सध्या या प्रकरणात एक ठोस पुरावा मिळविण्यास क्राइम ब्रँच यशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. त्याच आधारावर क्राइम ब्रँचकडून मेघनाच्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्यात येणार आहे. या प्रकरणात केवळ जबान्यांवर अवलंबून राहणे जोखमीचे असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक व इतर स्वरूपाचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न क्राइम बँचने चालविला होता. त्यात त्यांना यश आल्याचे सांगितले जाते.
नामुष्की टाळण्यासाठीही....
मेघनाच्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणे, हे क्राइम ब्रँचला खूप महत्त्वाचे ठरले आहे. याचे कारण म्हणजे अपघात झाला, तेव्हा मेघना ही मर्सिडीसमध्ये होती. दुसरे कारण म्हणजे पोलिसांनी फोंडा न्यायालयात तिच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आपले म्हणणेच सादर न केल्यामुळे पोलिसांच्या तपासावरच राज्यभर शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे निदान विश्वासार्हता टिकविण्यासाठीची धडपड म्हणून तरी या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणे भागच आहे.