गोव्यातील मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातून एका सराईत गुन्हेगाराचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 01:45 PM2020-03-12T13:45:32+5:302020-03-12T13:45:36+5:30
रात्री प्रकृती बिघडल्याचे त्याला बाळळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिले. त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाईही तैनात केले होते.
मडगाव: गोव्यातील मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळातून एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. काल बुधवारी रात्री ही घटना घडली. गॅबी फर्नांडिस (२५) असे या संशयिताचे नाव असून, चोरीप्रकरणी त्याला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली होती. रात्री प्रकृती बिघडल्याचे त्याला बाळळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिले. त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाईही तैनात केले होते.
हॉस्पिसियोच्या पुरुष शस्त्रक्रिया वॉर्डमध्ये त्याला दाखल केले असता, त्याने पोलीस शिपाई सर्वेश नाईक याला मारहाण करून पळ काढला. नंतर यासंबधी फातोर्डा पोलीस ठाण्यात नाईक यांनी रितसर तक्रार नोंद केली. भारतीय दंड संहितेच्या ३५३ व २२४ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान गॅबी याला इस्पितळात दाखल करताना त्याच्यासोबत ड्युटीसाठी जे दोन पोलीस शिपाई होते, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होउ शकते. २0१८ साली कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात घडलेल्या एका वाहन चोरी प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती. चोरी प्रकरणात त्याला कुडचडे येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.