‘उध्वस्त संसार उभारणारे सीमापार हात’, सुर्लावासियांचे परमेश्वरी कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:23 PM2018-08-14T21:23:40+5:302018-08-14T21:23:59+5:30
सुर्लातील गावक-यांनी केवळ गावात दारू बंदी केली एवढेच बहुतेकांना ठाऊक आहे. परंतु त्याहीपुढे जाऊन त्यांनी परमेश्वरी कार्य केले आहे.
पणजी: सुर्लातील गावक-यांनी केवळ गावात दारू बंदी केली एवढेच बहुतेकांना ठाऊक आहे. परंतु त्याहीपुढे जाऊन त्यांनी परमेश्वरी कार्य केले आहे. ‘माझ्या गावातील दारू पिऊन गावातील तसेच शेजारील गावातील अनेक तरूण मरून गेले आहेत’ या भावनेने त्यांच्या विधवा पत्नी व मुलांबाळांच्या अर्थसहाय्यासाठी निधी उभारण्याचे काम सुर्लावासियांनी सुरू केले आहे.
सत्तरी तालुक्यातील या सुर्ला गावात दारुच्या आहारी जाऊन अवघ्या ३० व ४० वर्षे वयातच जीवन संपविणा-या सात युवकांची उदाहरणे ते देतात. त्यांच्या विधवा पत्नी व मुलांची जगण्यासाठीची धडपड सांगताना ते गहिवरतात. कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या या गावचे शेजारी हे कर्नाटकवाले. सुर्लात दारू बंदीसाठीच्या चळवळीची वार्ता ऐकून सीमेपलीकडील गावातील अनेक पीडित महिला सुर्ला येथे आल्या होत्या. त्यांचे पती दारूच्या नशेमुळे जर्जर होवून मरून गेल्याचे सांगणा-या या महिलांनी दारुबंदीच्या चळवळीला पूर्ण पाठिंबा दर्शविला. त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर येथील गावक-यांनी एक आधार निधी उभारण्याचा संकल्प सोडला व त्यासाठी कामही सुरू केले.
या निधीचा वापर अशे उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी केला जाणार आहे. त्यात कर्नाटक व सुर्ला मधील सीमेचा अडथळा असणार नाही. गावातील तरूण दारूच्या आहारी जाऊन स्वत:ला संपवित आहेत याची ज्वलंत उदाहरणांचे कटु घोट गळलेली ही माणसे गावांसाठी एकवठलेली आहेत. लोकात जागृती करून ग्रामसभेत दारुबंदीसाठी त्यांनी ठराव मंजूर करून घेतला. उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने घातलेली तात्पुरती बंदीची मूदत आणखी वाढविण्यात यावी यासाठी हे लोक जिल्हाधिका-यांना भेटण्यासाठी पत्रकार पांडुरंग गावकर यांच्या नेतृत्वाखाली पणजीत आले होते.
जिल्हाधिका-यांना भेटल्यानंतर त्यांनी अबकारी आयुक्तांचीही भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला तेव्हा आपल्या गावातील कथा व व्यथाही त्यांनी कथन केल्या. सभा भाषणे व सोपस्कार यांच्या पंक्तीलाही कधी न गेलेली ही कृतीसमितीची मंडळी गणू गावकर, सूर्यकांत गावकर, संतोष गावकर, दिपाजी गावकर, अर्जून गावकर व इतर हे अगधी काळजातून बोलत होते हे जाणवत होते. ब-याच वेळा ते सर्व जण एका सुरांतही बोलताना दिसत होते.