Coronavirus: गोव्यात कर्फ्यू जरी किंचित शिथिल; पण पुढील काळ धोक्याचा- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:55 PM2020-03-23T22:55:01+5:302020-03-23T22:57:54+5:30
रविवारी सायंकाळी सगळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गोमंतकीयांची गैरसोय
पणजी : गोव्यात कर्फ्यू जरी किंचित शिथिल केला गेला तरी, पुढील आठ दिवस हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप धोक्याचे आहेत असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोमंतकीयांना दिला. सकाळी सहा ते अकरा या वेळेतच भाज्या, मासे, दूध, फळे, धान्य खरेदीची मुभा सरकारने गोमंतकीयांना दिली आहे. उद्या बुधवारपर्यंत कर्फ्यू कायम आहे, फक्त काही शिथिलता दिली गेली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोमंतकीयांनी कडधान्य, भाज्या, फळांचा साठा केला नव्हता. त्यामुळे रविवारी सायंकाळी सगळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गोमंतकीयांची गैरसोय झाली. मात्र आरोग्याच्या दृष्टीने थोडी गैरसोयही सहन करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सर्व मंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. येत्या दि. 31 मार्चपर्यंत गोमंतकीयांनी खूप काळजी घ्यावी लागेल. बेफिकीर राहून मुळीच चालणार नाही व त्यामुळे रस्त्यावर तीनपेक्षा जास्त गोमंतकीयांनी जमू नये व अकारण बाजारपेठ किंवा इतरत्र जाऊ नये, असे आवाहन सावंत यांनी केले.
मंगळवार दि. 24 व बुधवार 25 रोजी सकाळी सहा ते अकरा या वेळेत गोमंतकीयांनी दुकानांमधून भाज्या, धान्य, फळे, मासे, मांस वगैरे खरेदी करावे. छोटी सुपर मार्केट्स, किराणा मालाची दुकाने पाच तास खुली राहतील. लोकांनी गर्दी टाळावी. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. रस्त्यावर फिरू नये. तिघांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमल्यास जमावबंदीचे उल्लंघन होईल. गुढी पाडवा देखील कुणी साजरा करू नये. तसेच मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज म्हणू नये. हिंदू, ख्रिस्ती किंवा मुस्लिमांचे कुठेही एकत्रिकरण दिसले तर पोलीस कारवाई करतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
या सेवा सुरू राहतील
राज्यात काही वेळासाठीच बँका सुरू राहतील. एटीएम सुरू राहतील. सरकारी खात्यांमध्ये गरजेचे तेवढेच कर्मचारी उपस्थित असतील. वीज, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, पालिका सेवा, सुलभ शौचालये, जनावरांचे दवाखाने, टपाल, प्रसार माध्यमे, अग्नी शामक यंत्रणा, पोलिस, कायदा व सुव्यवस्था राखणा:या सर्व यंत्रणा, टेलिकॉम, तुरुंग सुरू राहील. त्यांना बंदीतून वगळले गेले आहे.