चलनातील नोटा चोरल्या, नोटबंदीतील तिथेच ठेवल्या; पोलिसांपुढे कबुली, कोर्टात म्हणाला 'तो मी नव्हेच'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:59 PM2023-02-06T17:59:10+5:302023-02-06T18:00:36+5:30
सुरुवातीला तपासाला सहकार्य न करणारा मुजाहीद हा पोलिसांच्या हातचा 'प्रसाद' खाल्ल्यानंतर पोपटासारखा बोलाया लागला आहे.
पणजी: पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात चोरी करणारा संशयित वकील मुजाहीद शेख याने चोरी करताना कोणतीही घाई वगैरे केली नाही, असे पोलिसांना तपासात आढळले आहे. आपण चोरी नव्हे तर एखादे कार्यालयीन कामच करीत आहे, अशा थाटात भरपूर वेळ घेऊन त्याने मुद्देमाल लंपास केला. विविध प्रकरणात जप्त झालेली रोख रक्कम तेथे होती. मात्र, मुजाहीदने नोटबंदीमध्ये चलनातून काढून टाकण्यात आलेल्या जुन्या नोटा वेचून बाजूला काढून ठेवल्या आणि सध्या चलनात असलेल्या ४ लाख ७५ हजारांच्या नोटा तो घेऊन गेला.
न्यायालयातील चोरी प्रकरणात संशयित मुजाहीद शेख याने चोरलेल्या रकमेतील ४.७५ लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना अखेर यश आले. सुरुवातीला तपासाला सहकार्य न करणारा मुजाहीद हा पोलिसांच्या हातचा 'प्रसाद' खाल्ल्यानंतर पोपटासारखा बोलाया लागला आहे.
आपण चोरलेली रक्कम कुठे ठेवली हेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वाळपईत जाऊन त्याच्या कार्यालयातून ती रोकड जप्तही केली. चोरी केल्यावर सील करून ठेवलेला मुद्देमाल कापून त्याने त्यातील पैसे काढल्याचे त्याने जबानीत सांगितले आहे.
याशिवाय, मुजाहीदने आणखीही काही ठिकाणी चोऱ्या केल्या असण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती काढून घेण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहेत. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.
संशयित म्हणतो... 'तो मी नव्हेच'
दरम्यान, संशयित मुजाहीद शेख हा वकील असल्यामुळे पोलिसांच्या तावडीत सापडल्यावरही कसे वागावे व कसे बोलावे, याची खबरदारी तो घेताना दिसत आहे. पोलिसांचा मार चुकविण्यासाठी पोलिस कोठडीतील चौकशीवेळी तो सर्व काही सांगून टाकतो. कशी चोरी केली, किती चोरी केली व चोरीचा माल कुठे ठेवला याची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली. परंतु न्यायालयात त्याने 'तो मी नव्हेच' अशी भूमिका घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"