सायबर गुन्हे, बनावट सीम कार्ड, ड्रग्सबाबत कठोर पावले, पश्चिम विभागीय पोलीस समन्वय बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 09:13 PM2018-03-09T21:13:06+5:302018-03-09T21:13:06+5:30
पश्चिम विभागीय पोलीस समन्वय समितीची बैठक शुक्रवारी दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न झाली.
पणजी- पश्चिम विभागीय पोलीस समन्वय समितीची बैठक शुक्रवारी दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न झाली. या बैठकीत सायबर गुन्हे, बनावट सीम कार्ड, आंतरराज्य बनावट शस्रास्र परवाने या विषयांवर प्रामुख्याने झाली. फरारी असलेल्या वाँटेड गुन्हेगारांसंबंधी माहितीची देवाणघेवाण केली जावी, असे ठरले. गोव्याकडे असलेली वाँटेड गुन्हेगारांची माहिती इतर राज्यांच्या पोलिसांना देण्यात आली.
गोवा पोलीस दलच या बैठकीचे यजमान होते. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर व इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत होते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच या विभागातील अन्य राज्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. राजस्थान व मध्यप्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, दमण दिवचे उपमहानिरीक्षकांनी बैठकीत भाग घेतला. कोकण रेल्वेचे पोलिस महानिरीक्षकही आले होते. विभागीय सुरक्षेच्यादृष्टीने उचलावयाच्या पावलांबाबत चर्चा झाली.
गुप्तचर शाखेच्या संयुक्त संचालकांनी देशभरातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. या विभागातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. मुक्तेश चंदर यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत उघडलेल्या ट्राफिक सेंटिनल या खास मोहिमेची माहिती दिली. वॉटसअपवर वाहतूक उल्लंघनाचे फोटो किंवा चित्रफिती आल्यानंतर केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर सांगितले. ड्रग्स माफियांबाबत अन्य राज्यांनी गोवा पोलिसांना आवश्यक ती माहिती पुरवावी, अशी मागणी करण्यात आली.
ड्रग्सबाबत कठोर पावले गोव्याच्या अंमली पदार्थविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक चालू महिन्याच्या तिसºया आठवड्यात हिमाचलप्रदेशमधील कुलू येथील तसेच राजस्थानमधील अजमेर येथील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन ड्रग माफियांना जेरबंद करण्यासाठी संयुक्त धोरण निश्चित करणार आहेत.
एटीएमबाबत गुन्ह्यांवरही चर्चा अलीकडच्या काळात एटीएमबाबतचे गुन्हे वाढल्याने त्याविषयीही चर्चा झाली. एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढण्याच्या ज्या घटना घडत आहेत त्याबाबत चर्चा झाली. गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना त्यांच्या एटीएम केंद्रात पुरेशी सुग़क्षा व्यवस्था ठेवण्यास बजावण्यात आले असल्याचे चंदर यांनी स्पष्ट केले. बँका तसेच विमा कंपन्यांना सतर्क करायला हवे याबाबत मतैक्य झाले.
दरम्यान, आंतरराज्य गुन्हेगार टोळ्या तसेच सराईतांबाबत माहितीच्या देवाण घेवाणीसाठी या विभागातील सर्व राज्यांच्या जिल्हा अधिक्षकांची बैठक घेण्याचे तसेच संयुक्त धोरण ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेगाड्यांमध्ये होणाºया चोºयांचा विषयही चर्चेला आला. याआधी या समितीच्या बैठका मुंबई, भोपाळ, अहमदाबाद तसेच जयपूर येथे झालेल्या आहेत.