Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 07:52 PM2020-05-31T19:52:56+5:302020-06-02T12:05:13+5:30
ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील.
पणजी: अरबी समुद्रात गोव्याच्या नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल. याच्या प्रभावामुळे गोव्यात रविवारी अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सोमवारीही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी सकाळपासून गोव्यात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. आकाश पावसाच्या ढगांनी व्यापलेले होते. सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
निसर्ग आणि गती अशी एकाच वेळी 2 चक्रीवादळे?
बंगालच्या उपसागरात निर्माण होणा-या चक्रिवादळांच्या तुलनेत अरबी समुद्रात फार कमी चक्रीवादळे निर्माण होतात. विद्यमान स्थितीत अरबी समुद्रात दोन ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. एक ओमानच्या जवळ असून, गुजरातच्या दिशेने सरकत आहे. गोव्याच्या नैऋत्येला निर्माण झालेल्या कमी दाबाचे चक्रीवादळात निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाल्यास पहिले ‘निसर्ग’ चक्रीवादळ तर दुसरे ‘गती’ चक्रीवादळ नामकरण होणार आहे.