Cyclone Tauktae : गोव्यात वादळामुळे प्रचंड हाणी; केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहा यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:28 PM2021-05-17T16:28:46+5:302021-05-17T16:30:11+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे.
पणजी : गोव्यात वादळाने जी प्रचंड हानी केली आहे, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशी केली व गोव्यातील स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य तथा पाठींबा मिळेल, अशी ग्वाही दिली आहे. (Cyclone Tauktae: Massive damage due to storms in Goa; All assistance will be provided by the central government says Amit Shah)
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे. शहा यांचा फोन आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शहा यांना याविषयीची कल्पना दिली. राज्यात वादळामुळे दोघांचा बळी गेला व चौघे जखमी झाले. आपत्त्कालीन निधीतून राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे. वादळामुळे ज्यांची हानी झाली त्यांना गोवा सरकार सहाय्य करील, असे मुख्यमंत्र्यांनीही सोमवारी म्हटले आहे.
अनेक गावे अंधारात
दरम्यान, तिसवाडी, फोंडा, सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली, बार्देश, धारबांदोडा आदी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी दुपारपर्यंत तिथे वीज सुरळीत झाली नाही. पणजी व काही शहरांमधील वीज पुरवठा सुरळीत झाला. वीज खात्याची यंत्रणाही दिवसभर काम करत आहे. रात्रीच्यावेळीही वीज कर्मचारी काम करतात. त्यामुळे थोड्या ठिकाणी तरी वीज पुरवठा सुरळीत झाला पण काही भागांमध्ये काँक्रीटचे वीज खांब मोडून पडले. वीज तारा तुटल्या. ट्रान्सफोर्मर मोडले. वीज उपकेंद्रे बिघडली. तिथे साधनसुविधा उभ्या करण्यासाठी एक- दोन दिवस लागतीलच, असे खात्याच्या सुत्रांनी सांगितले. ताळगावमध्येही वीज पुरवठा चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ खंडीत आहे. दोनापावलच्या काही भागातली अशीच स्थिती होती. वीज नाही, म्हणून पाणी नाही अशी समस्या ताळगावमधील काही लोकांनी अनुभवली.
रस्त्यावरील अडथळे हटविण्याचे काम अग्नीशामक दलाचे जवान करत आहेत. एका पणजी व परिसरातून ८० फोन कॉल्स अग्ग्नीशामक दलाला आले. नगरसेवक, पंच, सरपंच यांनी मिळूनही काही मोडलेली झाडे कापणे किंवा ती रस्त्यावरून हटवून घेणे, असे काम केले.
कृषी क्षेत्राच्या हानीची पाहणी (चौकट)
शेतकरी व बागायतदारांची वादळाने खूप हानी केली. गोव्याने असे वादळ कधीच अनुभवले नव्हते, असे लोकांनी सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी फिल्डवर जावे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकाची हानी पहावी व पाहणी अहवाल तयार करून तो तीन दिवसांत सादर करावा, असा आदेश उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे.