लोकसभेसाठी सिलिंडरच्या किमती उतरविलेल्या नाही, गोवा भाजपकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:49 PM2023-08-31T17:49:29+5:302023-08-31T17:50:02+5:30
भाजप सरकारने लोकांच्या हितासाठी विविध याेजना राबवित आहे. लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सुरक्षा योजना अशा विविध योजना सुरु आहे.
नारायण गावस
पणजी: केंद्र सरकारने रक्षाबंधन निमित्ताने महिला भगिनींना एलपीजी गॅस सिलिंडर किंमत २०० रुपयांनी कमी करून त्यांना चांगली भेट दिली आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचे आरोप काँग्रेसने केल्यानंतर हा राजकीय डाव नसून लोकांच्या चांगल्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गोवा भाजप प्रवक्ते तथा राज्य सचिव दयानंद सोपटे यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकारने लोकांच्या हितासाठी विविध याेजना राबवित आहे. लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सुरक्षा योजना अशा विविध योजना सुरु आहे. या सर्व याेजना फक्त मते मिळविण्यासाठी नव्हे तर लाेकांच्या हितासाठी आहे. कॉँग्रेस काळातही सिलींडच्या किमती ९०० रुपये होते त्यावेळी महागाई नव्हती काय? असा प्रश्न साेपटे यांनी उपस्थित केला.
यावेळी पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते अॅड. यतीश नाईक, एसटी मोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रभाकर गावकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर उपस्थित होत्या. यातिश नाईक यांनी सांगितले की, उज्वला योजनेंतर्गत ४०० रुपयांचा फायदा होणार आहे तर इतर सर्वांना २०० रुपयांचा फायदा होणार आहे.
सामान्य लोकांना फायदा व्हावा या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. भाजप गोवा प्रदेशाच्या वतीने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना हा निर्णय लोकांसाठी फायदा देणारा ठरल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.