दाबोळी विमानतळ बंद होणार नाही; केंद्राडून गोव्याला भरीव अर्थसहाय्य - विश्वजित राणे
By किशोर कुबल | Published: May 1, 2024 04:01 PM2024-05-01T16:01:07+5:302024-05-01T16:01:52+5:30
विश्वजित म्हणाले की, 'जनतेच्या जीवनात परिवर्तन आणणे हाच भाजपचा ध्यास आहे.
पणजी : दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. केंद्र सरकारकडून गोव्याला भरीव अर्थसहाय्य मिळत आहे. त्यामुळेच वेगवेगळे प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत विश्वजित म्हणाले की, 'जनतेच्या जीवनात परिवर्तन आणणे हाच भाजपचा ध्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने ३५० कोटी रुपये खर्चून कर्करोग इस्पितळाचे बांधकाम चालू आहे. टाटा मेमोरियलच्या सहयोगाने गोमेकॉत कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू केली. ५० परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत.'
केंद्र सरकारने मोठमोठ्या जागतिक परिषदांसाठी तसेच बड्या विवाह समारंभासाठी गोवा हे 'डेस्टिनेशन' बनावे, यासाठी पुरेसा निधी देऊ केला आहे. जी- ट्वेंटी तसेच अन्य मोठ्या जागतिक परिषदा येथे झाल्या. त्याचा पर्यटनासाठी मोठा फायदा होणार आहे. विकासाच्या बाबतीत संपुआ सरकार केंद्रात असताना गोव्यात एवढे प्रकल्प आले नाहीत. गेल्या दहा वर्षात झालेली प्रगती संपुआ सरकारच्या तुलनेत बरीच तोकडी आहे, असे विश्वजित राणे म्हणाले.
आयुष्यमान भारत व दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना विलीन करून लोकांना अधिक लाभ देण्यात येत आहे. बांबोळी येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभे राहिले. तज्ञ डॉक्टर आम्ही सेवेत घेत आहोत. रोबोटिक शस्त्रक्रियांपासून अपत्यहिनांसाठी आयव्हीआर उपचार मोफत दिले जात आहेत. कर्क रुग्णांसाठी साडेचार लाखांची लस मोफत दिली जाते. सरकार जनतेच्या औषधांवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
गोव्याला काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. सरकारची ही कामगिरी पाहून गोव्यातील दोन्ही जागांवर जनता भाजप उमेदवारांनाच कौल देईल, याबाबत शंका नाही, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. यापत्रकार परिषदेस आमदार केदार नाईक तसेच प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.