दाबोळी बंद नव्हे विस्तारणार: मुख्यमंत्री, विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत वास्कोमध्ये सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 11:48 AM2024-03-11T11:48:04+5:302024-03-11T11:48:46+5:30
गोवा भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने 'विकसित भारत विकसित गोवा' अंतर्गत वास्को मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : निवडणूकी जवळ येत असल्याने आणि विरोधकांशी काहीच नसल्याने त्यांनी आता पुन्हा अफवा पसरवण्यास सुरवात केली आहे. दाबोळी विमानतळ सदैव चालू राहणार असून तो कधीच बंद होणार नाही. उलट दाबोळी विमानतळाचा भविष्यात आणखीन विस्तार आणि विकास होणार असे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने 'विकसित भारत विकसित गोवा' अंतर्गत वास्को मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री सावंत बोलत होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांच्याहस्ते वास्कोतील सरकारी शाळेच्या इमारतीच्या केलेल्या नुतनीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पुढाकार घेऊन जनतेसाठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.
यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, मुरगाव नगराध्यक्ष गिरीश बोरकर, अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक, अमेय चोपडेकर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० वर्षात भारत देशाचा मोठा विकास झालेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षात भाजप सरकारने देशातील ४ कोटी गरीब कुटुंबियांना घरे बांधून देण्याबरोबरच ११ कोटी कुटुंबियांच्या घरात नळ पोचवले आहेत. लोकहिताच्या दृष्टीने अन्य अनेक विकासकामे केलेली आहेत. गोमंतकीय नक्कीच पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, दहा वर्षात केंद्राच्या भाजप सरकारने देशात अभूतपूर्व विकास केलेला असून त्या विकासात गोवा राज्याचा समावेश आहे.
मुरगाव तालुक्यातील जनतेने सदैव भाजपला पाठींबा दिलेला असून भविष्यातही त्यांचा पाठींबा अशाच प्रकारे कायम रहाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी भविष्यात केंद्र सरकारच्या निधीतून अनेक उत्तम सुविधा असलेले वास्को, पणजी, मडगाव आणि म्हापसा येथे भव्य असे बसपोर्ट प्रकल्प उभे राहणार असल्याची माहीती दिली.