नाफ्तावाहू जहाजाला नायट्रोजनचा दैनिक पुरवठा, सुरक्षिततेसाठी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:21 PM2019-11-13T12:21:28+5:302019-11-13T12:22:24+5:30
नाफ्तावाहू जहाजात कंटेनर असून कंटेनरमध्ये नाफ्ता आहे. जहाजाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
पणजी : दोनापावल येथील समुद्रात अडकलेल्या जहाजात नाफ्ता असल्याने जहाजाला दररोज नायट्रोजनचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑक्सीजनचे प्रमाण कमी रहावे या हेतूने नायट्रोजनचा पुरवठा केला जात आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले आहे.
नाफ्तावाहू जहाजात कंटेनर असून कंटेनरमध्ये नाफ्ता आहे. जहाजाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या कामाचा एक भाग म्हणून जहाजाच्या कार्गो टँकला दररोज नायट्रोजन पुरविला जात आहे. त्यामुळे ऑक्सीजनचे प्रमाण कमी राहते. यामुळेच भोपाळसारखी वायू दुर्घटना नाफ्तावाहू जहाजामुळे घडू शकणार नाही, असे सरकारला वाटते. जहाजातील नाफ्ता काढण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अगोदर दोन कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते. सिंगापुरच्या स्मीत साल्वेज कंपनीने व नेदरलँडच्या मरिन मास्टर्स कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावांचा डीजी शिपिंगकडून अभ्यास करण्यात आला. स्मीत साल्वेज कंपनीने माघार घेतली. त्यामुळे मरिन मास्टर्स कंपनीला नाफ्ता काढण्याचे काम मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकमतला सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी डीजी शिपिंगचे अधिकारी, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली. नाफ्ता काढण्याच्या कामावर सुमारे 25 कोटी खर्च होतील. हा खर्च जहाज मालक करील किंवा जहाजाच्या विमा कंपनीकडून तो वसुल करून घेतला जाणार आहे. नाफ्ता काढल्यानंतर जहाजही हटवावे लागेल. नाफ्ता काढण्याच्या कामाची सुरूवात पुढील पंधरा दिवसांत होईल. पण, काम प्रत्यक्ष कधी पार पडेल याची कल्पना कुणालाच नाही असे सध्या दिसून येते. नाफ्ता काढण्यास वीस दिवसांचा कालावधी लागेल असे सरकारला वाटते. पण, ज्या कंपनीला या कामाचे कंत्रट मिळणार आहे, त्या कंपनीने अजून याविषयी काहीच भाष्य केलेले नाही. डीजी शिपिंग व मुरगाव पोर्ट ट्रस्टने नाफ्तावाहू जहाज गोव्याच्या सागरी हद्दीत आणण्याची परवानगी का दिली होती, याचे उत्तर विरोधी पक्षाला अजुनही मिळाले नाही. अद्याप पोलिस तपास कामही पुढे जाऊ शकलेले नाही.