दलाल गजाआड; कळंगुट भागातून २८ जणांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:44 AM2023-04-30T11:44:24+5:302023-04-30T11:46:05+5:30
पर्यटकांची लूटमार, फसवणूकप्रकरणी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : कळंगुट परिसरातील किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणाऱ्या दलालांवर पोलिसांनी कारवाई करताना २८ दलालांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वाळपई, आगशी तसेच कोलवाळ स्थानकाच्या निरीक्षकांनी भाग घेतला होता. कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
यात कळंगुटसोबत डिचोली, वाळपई तसेच इतर स्थानकांवरील ६० हून अधिक पोलिसांचा समावेश करण्यात आला होता. कळंगुट परिसरातील विविध भागांत दलालांवर देखरेख ठेवण्यासाठी या सर्व पोलिसांना साध्या वेशात मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी सुरू झालेली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. यावेळी कळंगुट परिसरात येणाऱ्या पर्यटकांना स्वत:कडे आकर्षित करून त्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवण्याच्या प्रयत्नात असताना या सर्व दलालांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या दलालातील बहुतेकजण हे इतर राज्यांतील पण गोव्यात वास्तव्य करून राहणारे आहेत. यात कर्नाटक, आसाम, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, राजस्थान, ओडिसा, हरयाणा, उत्तराखंड, मेघालय यांसारख्या राज्यातील होते. त्यांना नंतर कळंगुट पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात पर्यटन व्यवसाय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात आला. नंतर सर्वांना पुढील कार्यवाईसाठी पर्यटन खात्यात हजर करण्यात आले. पर्यटकांना लुबाडणाऱ्या या दलालांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कायद्यात त्यांना ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड निश्चित केलेला आहे. किनारी भागांमध्ये या दलालांवर धडक कारवाई सुरूच ठेवली जाईल, असा इशारा पर्यटन खात्याच्या संचालकांनी दिला.
तक्रारींची दखल
कळंगुट तसेच कांदोळी, बागा, सिकेरी येथील किनारी भागात पर्यटकांच्या दलालांकडून होणाऱ्या फसवणुकीसंबंधीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. स्थानिकांनी, पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांनी या दलालांवर कारवाईची मागणी केली होती. स्थानिक पंचायतीकडून मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदनही सादर केले होते. अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
६० जणांचे पथक
गोवा पोलिस व पर्यटन खात्याने ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यासाठी डिचोली, वाळपई, कोलवाळ तसेच अन्य पोलिस खात्यांच्या अधिकाऱ्यांसह ६० जणांचे पथक स्थापन केले आहे. गोवा टुरिस्ट ट्रेड कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. तसेच अटक केलेल्या दलालांवर कायदेशीर केली जाईल, असे वाल्सन यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"