महाराष्ट्राकडून धरणाचे काम बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:45 PM2023-04-04T17:45:04+5:302023-04-04T17:45:11+5:30
कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे.
मयुरेश वाटवे
पणजीः
कर्नाटकनंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे. गोव्याच्या आक्षेपानंतर महारष्ट्राने विर्डी धरणाचे काम थांबविले आहे.
धरणाचे काम थांबविले असल्याची खात्री करून घेण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी विर्डी येथे धरणाच्या साईटवर भेट दिली. या पथकात जलस्रोत खात्याचे संचालक प्रमोद बदामीही होते. धरणाचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.तसेच त्या साईटची छायाचित्रेही त्यांनी घेतली आहेत.
विर्डी येथे महाराष्ट्र स रकारने धरणाचे बांधकाम सुरू केल्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली. कर्नाटकनंतर महाराष्ट्रही बेकायदेशीरपणे म्हादई वळविण्याचे काम सुरू करते आणि गोवा सरकारला याचापत्ताही लागत नाही या गोष्टीमुळे पर्यावरणवाद्यांनी संतापही व्यक्त केला होता.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सोमवारी नोटीस बजावली होती.विर्डी येथे धरणाचे बांधकाम कोणत्या अधिकारिणीची परवानगी घेऊन सुरू करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच चालू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्यास सांगितले होते
मंगळवारी महाराष्ट्र सरकारकडून हे बांधकाम बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी या साईटवर बांधकाम सुरू झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.