"मराठी-कोंकणी एकत्र नांदणे मलाही मान्य", वादानंतर दामोदर मावजो यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:46 AM2024-09-04T09:46:11+5:302024-09-04T09:46:50+5:30
Damodar Mavjo News: ‘मराठी-कोंकणी पूर्वीपासूनच गोव्यात एकत्र नांदत आहेत. त्यांनी एकत्र नांदणे हे मलाही पूर्णपणे मान्य आहे. मराठी-कोंकणीत समन्वयाचीच भूमिका असायला हवी, पण कोंकणी ही मराठी भाषेची बोली असे म्हणून हिणवण्याची चूक मराठीवाद्यांनी करू नये,’ अशी भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांनी मांडली.
पणजी - ‘मराठी-कोंकणी पूर्वीपासूनच गोव्यात एकत्र नांदत आहेत. त्यांनी एकत्र नांदणे हे मलाही पूर्णपणे मान्य आहे. मराठी-कोंकणीत समन्वयाचीच भूमिका असायला हवी, पण कोंकणी ही मराठी भाषेची बोली असे म्हणून हिणवण्याची चूक मराठीवाद्यांनी करू नये,’ अशी भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांनी मांडली.
मावजो यांनी काल, सोमवारी ‘लोकमत’च्या पणजी कार्यालयास भेट देऊन संवाद कार्यक्रमात भाग घेतला. गोव्यात सुरू झालेल्या तीव्र भाषावादाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मुलाखत घेण्यात आली.
‘तुम्ही मराठीविरुद्ध बोलला होता का?’ असे मुलाखतीवेळी मावजो यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मी मुळीच मराठीविरुद्ध बोललो नाही. मी कधीच बोलणार नाही. कोंकणीला एकदम जवळची भाषा ही मराठी आहे. माझी मातृभाषा कोंकणी आहे पण मी मराठी चांगली बोलतो व चांगली लिहितो. मी बालपणी शाळेत मराठी शिकलो. पोर्तुगीजही शिकलो. अलिकडे माझे अनेक चर्चात्मक कार्यक्रम महाराष्ट्रात झालेले आहेत.’
मला एका पत्रकाराने राजभाषा कायद्याविषयी विचारल्याने ‘मी फक्त कोंकणी हीच एकमेव राजभाषा आहे व तीच एकमेव राजभाषा असावी’, असे म्हटले होते. पण थोडे चुकीचे छापून आले. राजभाषा कायद्यात मराठी नको ही भूमिका आम्ही १९८७ साली मांडली होती, हेही खरे आहे पण राजभाषा कायदा अस्तित्वात आल्यानंतर मीही वाद सोडून दिला व साहित्य निर्मितीच्याच कामासाठी स्वत:ला वाहून घेतले’ असे मावजो म्हणाले.
मावजो म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील मराठी लेखक व तेथील मराठी भाषिक माझा आज देखील पूर्ण आदर करतात. पण, गोव्यातील काही मराठीप्रेमींनी सध्याच्या वादात माझ्याविषयी चुकीचा समज करून घेतला, याबाबत मला वाईट वाटते. काही चांगले मराठीप्रेमी केवळ एका प्रतिक्रियेमुळे किंवा बातमीमुळे माझ्याविषयी चुकीचा समज करून बसले. काहीजण तर कोंकणी मराठीची बोली आहे, असे अन्यायकारक बोलून मोकळे झाले,’ असे मावजो म्हणाले.
मावजो म्हणाले की, ‘गोव्यात पोर्तुगीज काळापासून मराठीचा वापर केला जातो. एकेकाळी गोव्यातील हिंदू समाजाने धार्मिक व आध्यात्मिक कारणांसाठी मराठी भाषा स्वीकारली व ख्रिस्ती समाजाने पोर्तुगीज स्वीकारली होती. पण नंतर कोंकणीचा स्वीकार सर्वांनी केला. तरीदेखील आजसुद्धा बहुतांश हिंदू समाज त्यांची संस्कृती व धर्म व अध्यात्म यासाठी मराठीचाच वापर करतात. मी त्याविरुद्ध नाही. पण, केवळ त्यासाठी म्हणून ती राजभाषा ठरत नाही. जी भाषा बोलली जाते तीच राजभाषा. गोवा राजभाषा कायद्यात मराठीला राजभाषेचे स्थान नको, असे मी म्हणतोय. मराठीतून जर कुणी सरकारला पत्र पाठवले तर सरकारने मराठीतून उत्तर द्यावेच.
हिणवणे थांबवावे
- ‘कोंकणी-मराठीने एकत्र नांदावे या मताचा मी आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशातही एकत्र नांदावे. कोंकणी-मराठीत समन्वयाचीच भूमिका असावी पण ती एकतर्फी असू नये.
- केवळ कोंकणीप्रेमीच समन्वयाची भूमिका घेतील व मराठीवादी मात्र कोंकणीला बोली म्हणूनच हिणवत राहतील तर ते गैर आहे. ते मात्र मला मान्य होणार नाही,’ असे मावजो म्हणाले.
अंमलबजावणीचा आग्रह अवमान नव्हे
आपल्या मराठी संबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होणे हे फार चुकीचे असल्याचे मावजो म्हणाले. ‘कोंकणी-मराठीचे असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम टिकून राहावे, असे मला वाटते.
राजभाषा कायद्यानुसार एका राज्याच्या दोन भाषा असू शकत नाहीत. राजभाषा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणीचा आग्रह धरणे म्हणजे मराठीचा अवमान नव्हे,’ असे ते म्हणाले.
मी ‘लोकमत’ नियमितपणे वाचतो
- मी ‘लोकमत’ नियमितपणे वाचतो. भाषावादाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेला संदेश प्रभुदेसाय यांचाही कालचा लेख वाचला.
- मी मराठीचा विरोधक नव्हे, कोंकणी माझी मातृभाषा आहे व आज मी ‘लोकमत’मध्ये बोलताना देखील शुद्ध मराठीतच बोलत आहे.
- ‘मी कोंकणीतून चांगल्या प्रकारे साहित्य निर्मिती करू शकतो, कारण ती माझी मातृभाषा आहे. आजची मुले देवनागरी कोंकणी वाचतात हा माझा अनुभव आहे,’ असेही मावजो म्हणाले.