धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 10:43 AM2024-05-18T10:43:48+5:302024-05-18T10:45:10+5:30
धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जलस्रोत खात्याने शेतीसाठी कालव्यांद्वारे दिले जाणारे पाणी तीन दिवसांपूर्वी १५ मेपासून बंद केले आहे. तरीही धरणांमधीलपाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
धरणे आटली आहेतच, शिवाय काही नद्यांमधील पाणीही कमी झाले आहे. रगाडा नदी कोरडी तर पडली आहे. अंजुणे धरणात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. आमठणे धरणात ३२ टक्के, साळावली धरणात ३० टक्के, पंचवाडी धरणात २१ टक्के, तिळारी धरणात ३३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागांमध्ये आहे. लोकांनी बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा खात्यावर घागर मोर्चेही काढले आहेत.
राज्यातील रगाडा तसेच इतर नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत याबाबत याकडे लक्ष वेधले असता जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले की, पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या एप्रिल मेमध्ये कोरड्या पडतात. रगाडा तसेच वाळवंटी, डिचोली नदीचीही हीच स्थिती आहे. खांडेपार, म्हादई नदीत पाणी असते. कच्च्या पाण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.
आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सतर्कतेचे निर्देश
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस यांनी काल सर्व खात्यांची बैठक घेतली. पावसाळ्यात दरडी कोसळणे, पूर किंवा धोकादायक स्थितीत असलेले जीर्ण वृक्ष कोसळण्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. वाळवंटी नदीला थोड्याशाही पावसात पूर येतो व साखळी, डिचोली बाजारपेठा पाण्याखाली जातात. पणजीत मांडवी नदीला भरती असली आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास मळा भागात घरांमध्ये पाणी शिरते. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असतात त्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी घाटकोपर-मुंबई येथे वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे होर्डिंग कोसळून निष्पाप बळी गेले, या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्याविषयी सतर्कता बाळगण्याविषयी चर्चा झाली.
पालिका, पंचायतींना निधी
महसूल खात्याने परिपत्रक काढून पावसाळापूर्व कामांमध्ये झाडाच्या फांद्या तोडणे किवा झाड कापणे यासाठी महापालिकेला १ लाख रुपये, 'व' श्रेणी नगर पालिकांना ५० हजार रुपये व 'क' श्रेणी नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना २५ हजार रुपये निधी दिला जाईल, असे म्हटले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून हे पैसे दिले जातील.
पाणीसाठा पुरेसा : प्रमोद बदामी
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांचे मात्र असे म्हणणे आहे की, जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये आहे. अंजुणेत केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे नजरेस आणले असता ते म्हणाले की, या धरणाची क्षमता ४४०० हेक्टर मीटर आहे. २० टक्के जरी शिल्लक राहिले असे गृहीत धरल्यास ८०० हून अधिक हेक्टर मीटर पाणी आहे. आम्ही या धरणातून दररोज दीड ते दोन हेक्टर मीटरच पाणी घेतो. साळावलीतही पुरेसा पाणीसाठा आहे.