धोक्याची घंटा, गोव्याचा केरळ होणे अशक्य पण संकटे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 10:55 PM2018-08-19T22:55:24+5:302018-08-19T22:55:52+5:30
आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे.
पणजी: आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही टेकड्या कोसळणे, डोंगर खाली येणे असे प्रकार होवू शकतात. त्यामुळे पूर्वीच खबरदारीचे उपाय घेणे शहाणपणाचे ठरेल असे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एनआयओचे शास्त्रज्ञ डॉ.ए.के सरन यांनी यासंबंधी माहिती देताना म्हणाले, ‘गोव्यात पूर्वेला डोंगराळ भाग तर पश्चिमेला किनारपट्टी भाग आहे. किनारपट्टी असली तरी मोठ्या प्रमाणावर सखल प्रदेश नाहीत. जे काही सखल प्रदेश असतील त्या ठिकाणची जागा मोकळी ठेवणे उचित ठरणार आहे. अशा ठिकाणी बांधकामे होवू देऊ नये. गोव्यात केरळसारख्या मोठ्या नद्या नाहीत, असे असतानाही काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये तळपण, गाळजीबाग व पैंगीण या छोट्या नद्यांनी केलेला कहर लक्षात घेता खबरदारी घेणे अगत्याचे ठरत आहे. नदीचे दोन्ही काठ भरून पाणच्या पातळीने 2 मीटर अधिक उंची गाठली तर पाणी कुठे कुठे पोहोचू शकते याचा अभ्यास, आखणी व खबरदारीच्या उपाय योजना करून ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी टेकड्या कोसळण्याचा धोका अधिक आहे. कुठे कुठे टेकड्या कोसळण्याची शक्यता आहे, अशा जागांचीही पाहणी करुन उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. एनआयओचे आणखी एक शास्त्रज्ञ डॉ बबन हिंगोले यांनीही खबरदारी घेणे नितांत आवश्यक असल्याचे सांगितले.
केरळसारखी गोव्यात परिस्थिती नाही हे खरे आहे, परंतु मेरशी, पोंबुर्फा, पणजी व इतर काही ठिकाणी बरेच सखल भाग आहेत. करेळमध्ये नद्यांतील पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे हे पूरासाठी मुख्य कारण ठरले आहे. तशी परिस्थिती येथे होवू देता कामा नये. परिस्थिती कशी होवू नये याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे पाटो-पणजी या ठिकाणी झालेली इमारतींची दाटी. काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये आलेल्या पुराने काय परिस्थिती निर्माण केली होती, याचे स्मरणही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.