दक्षिण गोव्यात समुद्र किना-यांवर आढळले जेली फिश, पर्यटकांना समुद्रात उतरण्यापासून केले सर्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:47 PM2017-11-04T17:47:24+5:302017-11-04T17:48:22+5:30
गोव्यातील बायणा (वास्को), बेताळभाटी व वेळसांव या समुद्रकिना-याच्या पट्टयात जेली फिश दिसून आल्याने पर्यटकांना तसेच स्थानिकांना समुद्रात उतरण्या पासून सतर्क करण्यात आले आहे.
मडगाव - गोव्यात पर्यटक वाढले असतानाच दक्षिण गोव्यातील बायणा (वास्को), बेताळभाटी व वेळसांव या समुद्रकिना-याच्या पट्टयात जेली फिश दिसून आल्याने पर्यटकांना तसेच स्थानिकांना समुद्रात उतरण्यापासून सतर्क करण्यात आले आहे. काही जेली फि शचा दंश घातकही असू शकतो अशी सूचना दृष्टी लाईफ सेव्हींग या समुद्र सुरक्षा यंत्रणेने जारी केल्या आहेत.
दृष्टीने दिलेल्या माहितीप्रमाणे बायणा, बेताळभाटी व वेळसांव या समुद्र किना-याच्या पट्टयात देखरेख करणा-या जीवरक्षकांना जेली फिश आढळून आले. त्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून स्थानिकांनी किंवा पर्यटकांनी स्रानासाठी पाण्यात उतरू नये असा इशारा या आस्थापनाने दिला.
दृष्टीच्या अॅडव्हाजरी प्रमाणे जेली फिश दोन प्रकारचे असून त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात. बहुतेक जेली फिश अपाय करणारे नसतात. त्यानी दंश केल्यास केवळ वेदना होतात. मात्र काही जेली फिश विषारी असल्याने अशा जेलीशी संपर्क आल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
दंश झाल्यास हे उपाय घ्या -
जेली फिशचा दंश झाल्यास जवळच्या जीवरक्षकाशी त्वरीत संपर्क करा़
दंश झालेला भाग कडकडीत पाण्याने धुऊन काढा. कारण गरम पाणी विषाचे प्रमाण कमी करते.
दंश झालेला भाग सुजू नये आणि वेदना वाढू नयेत यासाठी दंश झालेल्या भागावर बर्फ ठेवा.
जर छातीत कळा येऊ लागल्या आणि श्वासोश्वास घ्यायला त्रास झाल्यास जवळच्या डॉक्टरशी संपर्क साधा.