दार्जिलिंगच्या चवदार ‘मोमोज’ची पर्यटकांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:35 PM2019-09-09T14:35:22+5:302019-09-09T14:39:25+5:30
देशभरात जी विविधता, संपन्नता दिसून येते, तीच सर्वसमावेशकता गोव्यातही आहे.
धनंजय पाटील
पणजी - देशभरात जी विविधता, संपन्नता दिसून येते, तीच सर्वसमावेशकता गोव्यातही आहे. येथे देशातील सर्व राज्यांतील रहिवासी जसे गुण्यागोविंदाने नांदतात, तसेच त्यांची संस्कृती, परंपराही ते येथे जाणीवपूर्वक निभावतात. अन्य राज्यांतून आलेल्या या बांधवांनी आपले राहणीमान आणि खानपान पद्धतीही या देवभूमी गोव्यात एकजीव केली आहे. याचाच प्रत्यय दार्जिलिंगमधून आलेल्या तमांग दाम्पत्याने दाखवून दिला आहे. त्यांचे दार्जिलिंग पद्धतीचे मोमोज देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
अवघ्या तीन वर्षांपूर्वी पोटा-पाण्यासाठी गोव्यात आलेले प्रताप तमांग आणि स्मृती तमांग या दाम्पत्याने व्यवसायाचा सरळधोपट मार्ग न पत्करता वेगळे काहीतरी करून दाखवण्याचे ठरविले. आणि तशी सुरुवातही केली. आज त्यांचे अंजुणा, वागातोर आणि आसगाव येथील स्टॉलवर मिळणारे शाकाहारी आणि मांसाहारी मोमोज पर्यटकांसह स्थानिकांच्याही पसंतीस उतरले आहेत.
वस्तूत: हा तिबेटीयन खाद्यपदार्थ व्हाया दार्जिलिंग असा गोव्यात आला आहे. चिकन खिम्याच्या मांसाहारी मोमोज इतकेच ताज्या भाज्यांपासून बनविलेले शाकाहारी मोमोजही खवय्यांच्या जीभेची रूच वाढवत आहेत. मैद्याच्या पिठाचे आवरण असलेले हे पांढरे मोमोज भरण्याचे काम प्रताप तमांग आणि त्यांचा सहकारी करतो. तर स्मृती तमांग या मोदकाप्रमाणेच हे मोमोज अवघ्या काही मिनिटांत उकडून डिशमधून खवय्यांसमोर सादर करतात. सोबत चवीसाठी मियोनीज, लसणाचा तिखट सॉस आणि शेंगदाण्याचा चवदार सॉसही असतो. अगदी माफक दरात एका व्यक्तीचे निश्चितच पोट भरेल, एवढे मोमोज एका डिशमध्ये असतात. त्यासोबत खवय्यांची भूक वाढविणारे विविध भाज्यांपासून बनविलेले पौष्टिक सूप अगदी विनामूल्य दिले जाते. खवय्यांची आवड-निवडही तमांग दाम्पत्य जोपासते. ज्यांना कोबी आवडत नसेल, त्यांच्यासाठी चीज, पालकपासून बनविलेले मोमोज दिले जातात.
मोमोज बनविण्याची खासियत
- हे मोमोज चवदार बनण्यामागचे गुपित स्मृती तमांग यांनी ‘लोकमत’शी बोलताना उघड केले. एरवी बाजारात कुठेही मोमोज उकळत्या पाण्यावर उकडलेले असतात. मात्र, तमांग यांच्याकडील मोमोज हे चक्क विविध भाज्यांपासून बनविलेल्या सुपाच्या आधणावर उकडले जातात. ज्यामुळे त्या भाज्यांचा अर्क मोमोजमध्ये पुरेपूर उतरतो आणि ते चवदार बनतात. ही खासियत असल्यानेच त्यांच्याकडे एकदा आलेला ग्राहक कधीच दुरावत नाही, अशी माहिती स्मृती यांनी दिली.