दाम्पत्याचा खून : परप्रांतीयांची चौकशी
By admin | Published: September 19, 2015 02:00 AM2015-09-19T02:00:52+5:302015-09-19T02:01:05+5:30
पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो (७५) आणि त्यांची पत्नी जे.सी. गुदिन्हो (७०) या दोघांचा अज्ञातांनी कोयत्याने वार करून निर्घृणरित्या खून करण्यात आला.
पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो (७५) आणि त्यांची पत्नी जे.सी. गुदिन्हो (७०) या दोघांचा अज्ञातांनी कोयत्याने वार करून निर्घृणरित्या खून करण्यात आला. या घटनेने धारगळ गावाबरोबरच पेडणे तालुका हादरला आहे. गुरुवारी (दि. १७) पहाटे ही घटना घडली. दरम्यान, हे खून प्रकरण कोणत्या कारणावरून घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुदिन्हो कुटुंबीय २५ ते ३० वर्षांपासून तळेवाडा-धारगळ येथे राहात होते. १७ रोजी चतुर्थीदिवशी अशोक आरोंदेकर हा सकाळी साडेनऊच्या सुमारास दूध घेऊन आला, तेव्हा त्यांच्या घरी भले मोठे दोन कुत्रे होते. त्यामुळे तो थेट आत जायला घाबरला. त्याने शेजारी राहणाऱ्या कामगाराला हाक मारली आणि दोघांनी घरात प्रवेश केला. त्या ठिकाणी सर्वत्र रक्त पडल्याचे भयानक दृश्य त्यांनी पाहिले. घर सताड उघडे होते. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पेडणे पोलिसांना दिली. रेजिनाल्ड गुदिन्हो हे मूळचे बस्तोडा, बार्देस येथील रहिवासी. २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यांनी धारगळ येथे जमीन विकत घेऊन दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे बिगरगोमंतकीय कामगार होते आणि अद्यापही आहेत. अनेकजण चालक म्हणून कामाला होते आणि नोकरी सोडून गेले. रेजिनाल्ड हे विदेशात नोकरी करायचे. गावात त्यांचे कुणाकडेही येणे-जाणे नव्हते. ते सतत कामात व्यस्त असत. या दाम्पत्याचा खून केल्याची तक्रार अशोक आरोंदेकर यांनी दिली होती. त्यानंतर पेडणे पोलिसांनी संशयितांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलम ४४९, २०३ या कलमांखाली गुन्हा नोंदवला. पेडणे पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड, म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, हणजूण पोलीस निरीक्षक पंकज नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत. निरीक्षक गाड यांनी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना बोलावून काही पुरावे मिळतात का, याचा शोध घेतला. पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच डीआयजी रंगनाथन, पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. (प्रतिनिथी)