सोपटे यांना जीटीडीसीचे चेअरमनपद, सरकारची बक्षिसी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:39 PM2018-11-08T13:39:39+5:302018-11-08T14:00:31+5:30

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांना पर्रीकर सरकारने अखेर बक्षिसी दिली आहे.

dayanand sopte is the Chairman of GTDC | सोपटे यांना जीटीडीसीचे चेअरमनपद, सरकारची बक्षिसी

सोपटे यांना जीटीडीसीचे चेअरमनपद, सरकारची बक्षिसी

Next

पणजी : काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांना पर्रीकर सरकारने अखेर बक्षिसी दिली आहे. गोवा सरकारचे महत्त्वाचे असे गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) सरकारने सोपटे यांना गुरुवारी बहाल केले आहे. सोपटे यांची या महामंडळाच्या चेअरमनपदी नियुक्ती करणारा आदेश सरकारने जारी केला व गुरुवारी सोपटे यांनी चेअरमनपदाची सुत्रेही हाती घेतली.

सोपटे आणि सुभाष शिरोडकर हे दोघे नेते अलिकडेच काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. दोघांनीही आमदारकी सोडली. दोघेही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. शिरोडकर यांना लगेच सरकारने गोवा आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) चेअरमनपद दिले. शिरोडकर यांच्यासाठी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी ईडीसीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला.

सोपटे यांना सरकारने गेले काही दिवस कोणतेच महामंडळ दिले नव्हते. सोपटे हे भाजपातर्फे यापुढे मांद्रे विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. सोपटे यांच्यासाठी वीजमंत्री निलेश काब्राल यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा द्यावा अशी सूचना काब्राल यांना मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र काब्राल यांनी चेअरमनपद सोडण्यास विलंब केला. काब्राल यांनी गेल्या शुक्रवारी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठकही घेतली. त्यानंतर मंगळवारी काब्राल यांनी महामंडळाचे चेअरमनपद सोडले. सोपटे यांच्याकडे चेअरमनपद सोपविले गेले तरी, महामंडळावरील पूर्वीचेच अन्य संचालक मात्र कायम आहेत. अन्य संचालकांमध्ये डॉ. एम. मोदास्सीर, डॉ. श्रीकांत आजगावकर, ज्योएल फर्नाडिस, पल्लवी शिरोडकर, ईरल ब्रागांझा, परेश केंकरे, माधव देसाई आदींचा समावेश आहे. पर्यटन महामंडळ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीत अनेक उपक्रम व प्रकल्प राबवित आहे. मांद्रे हा किनारपट्टीच्या क्षेत्रत येणारा मतदारसंघ आहे. 

Web Title: dayanand sopte is the Chairman of GTDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.