चिरेखाणीत वीस वर्षीय विवाहितेचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह
By आप्पा बुवा | Published: August 3, 2023 06:01 PM2023-08-03T18:01:20+5:302023-08-03T18:02:24+5:30
लक्ष्मी आनंद शिंदे (वय 20, मूळ कर्नाटक) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह चिरेखाणीच्या ठिकाणी वास्तव्यास होती.
दावकोण धारबांदोडा येथील रमाकांत गावकर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एका चिरेखाणीत सकाळी वीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. वृत्तानुसार लक्ष्मी आनंद शिंदे (वय 20, मूळ कर्नाटक) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह चिरेखाणीच्या ठिकाणी वास्तव्यास होती.
सदर चिरेखाणीवरच त्यांचे कुटुंबीय काम करत होते. बुधवारी संध्याकाळी पासून लक्ष्मी बेपत्ता झाली होती. सकाळी तिचे चप्पल चिरेखाणीच्या डोहा जवळ आढळून आले. तसेच काही युवकांना तिचे प्रेत तरंगताना तिथे आढळून आले. सदरची बाब लगेचच वाऱ्यासारखी पसरली . पोलिसांनी लगेचच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुळे पोलिसांचा पोलीस फौज फाटा घटनास्थळी हजर होता. उशिरापर्यंत तिथे धागेदोरे गोळा करण्याचे काम चालू होते.
घातपात की आत्महत्या?
प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी घातपाताचा संशय सुद्धा व्यक्त होत आहे. कारण मयत लक्ष्मी ही काही कालच तिथे राहायला आली नव्हती. तिला पाण्याचा अंदाज होता. परत आत्महत्या करण्यासारखे घरात वाद-विवादही नव्हते असे माहिती मिळत आहे. मृत झालेल्या लक्ष्मीचे वय फक्त वीस असल्याने पोलिसांनी सगळ्या अंगाने तपास सुरू केला आहे.