गोव्यात म्हादई अभयारण्यात मृत वाघ सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 08:13 PM2020-01-05T20:13:43+5:302020-01-05T20:22:35+5:30
म्हादई अभयारण्यात रॉयल बंगाली जातीच्या पट्टेरी वाघाचे (नर)शव कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
पणजी : गोव्यात सत्तरी तालुक्यातील गोळावली येथे म्हादई अभयारण्यात रॉयल बंगाली जातीच्या पट्टेरी वाघाचे (नर)शव कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अभयारण्यात वाघांचे अस्तित्त्व असल्याचे याआधी अनेकदा स्पष्ट झाले आहे. खबर मिळाल्यानंतर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शव ताब्यात घेतले. या वाघाचे वय ४ वर्षे असावे आणि पाच ते सहा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवचिकित्सा आज सोमवारी होणार आहे.
उपवनपाल विकास देसाई यांनी वाघाचा सांगाडा मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मृत्युचे कारण शवचिकित्सेनंतरच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. गेल्यावेळी राज्यात व्याघ्रगणाना झाली तेव्हा म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तित्त्व स्पष्ट झाले होते. शेजारी भीमगड आणि हंशी-दांडेली अभयारण्यातून वाघ या भागात येतात असा अंदाज व्यक्त केला जात होता.
‘राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करा’-
पर्यावरणप्रेमी तथा अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले की, ‘या भागात पाच वाघांचे अस्तित्त्व असल्याचे याआधी स्पष्ट झालेले आहे त्यामुळे वन खात्याने पुरेस मनुष्यबळ या अभयारण्यात नियुक्त करणे आवश्यक होते, ते केले नाही. गोळावली गावातील लोक तेथील ‘भुगूत’ या पारंपरिक कार्यक्रमासाठी सकाळी अभयारण्यात गेले होते तेथे सिध्दाच्या गुंफेजवळ त्यांना हा सांगाडा आढळून आला त्यानंतर वन अधिकाºयांना कळविण्यात आले. हा वाघ सुमारे ४ वर्षे वयाचा पट्टेरी वाघ असून नर जातीचा आहे. या अभयारण्यात वाघांचा संचार असल्याने तेथील शेती बागायती वगळून हा भाग राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तसा प्रस्ताव तयार केला होता परंतु पुढे या गोष्टीला चालना मिळाली नाही. गोळावली भागात काही दिवसांपूर्वी एक गाय आणि म्हैस ठार मारण्यात आली होती वाघानेच त्यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय आहे. या वाघाचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा क यास असल्याचे केरकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘ अभयारण्याचा हा भाग राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर झाल्यास म्हादईच्या पाण्याबाबतही फार मोठा दिलासा गोवा सरकारला मिळणार आहे.’ दरम्यान, २00९ साली सत्तरीतच एका वाघाला ठार केले होते याचे स्मरणही केरकर यांनी करुन दिले.
- वन खात्याने २0१६ व २0१७ साली या अभयारण्यांमध्ये काही ठिकाणी कॅमेरे बसविले होते. त्यातून प्राप्त झालेल्या छायाचित्रांव्दारे या भागांमध्ये वाघांचे अस्तित्त्व असल्याचे स्पष्ट झाले होते. कॅमेऱ्यांमुळे वाघांचे अस्तित्त्व स्पष्ट झालेले आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या हद्दीच्या भागात खास करुन चोर्ला घाटात वाघांचे अस्तित्त्व दिसून आले होते. त्याआधी २0१३ साली व्याघ्र गणना हाती घेण्यात आली होती परंतु त्यात काहीच निष्पन्न झाले नव्हते.
- वाघांचे अस्तित्त्व शोधून काढण्यासाठी या अभयारण्यांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव राज्य वन्यप्राणी मंडळासमोर ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाकडून त्यासाठी निधी मिळवला जाईल.
- मुख्य वन्यप्राणी वॉर्डन संतोष कुमार यांनी शवचिकित्सेनंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. उपवनपाल तसेच रेंज फॉरेस्ट अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. गोळावली भाग पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहे.