वाघांचे मृत्यू; गोव्याची अब्रू गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 06:17 AM2020-01-09T06:17:43+5:302020-01-09T06:17:46+5:30
शांत आणि सुशिक्षित गोवा म्हणून या राज्याची देशभर ख्याती आहे,
पणजी : शांत आणि सुशिक्षित गोवा म्हणून या राज्याची देशभर ख्याती आहे, पण चक्क म्हादई अभयारण्यातच चार पट्टेरी वाघ मृत्युमुखी पडल्याने गोव्याची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. वाघांच्या मृत्यूच्या घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली व सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
गोव्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघ आहेत की नाही याविषयी काही वर्षांपूर्वी वाद होता, पण वन खात्याने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये पाच वाघ टीपले गेले. त्यानंतर गोव्यात व्याघ्र प्रकल्प राबविला जावा अशा प्रकारच्या सूचना येऊ लागल्या. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना २०१६ साली राज्य वन्यप्राणी मंडळाच्या बैठकीत व्याघ्र प्रकल्पाविषयीचा प्रस्तावही चर्चेस आला होता. नंतर पर्रीकर आजारी पडले व हा प्रस्तावही बारगळला.
गेल्या आठवड्यात सत्तरी तालुक्यातील ठाणे पंचायत क्षेत्रात म्हणजेच म्हादई अभयारण्यातील गोळावली गावात मेलेल्या अवस्थेत वाघ सापडला. चार वर्षांचा तो वाघ विषबाधेमुळे मेल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन खात्याने काढला. या प्रकरणी सखोल चौकशी करा, असा आदेश मग मुख्यमंत्री सावंत यांनी वन खात्याला दिला. त्या वाघाचे काही अवयव काढून चाचणीसाठी वन खात्याने हैद्राबाद व देहरादून येथील प्रयोगशाळांना पाठवले आहेत.
या वाघाची नखे अगोदरच गायब झालेली असल्याचे खात्याला आढळून आले. तथापि, खात्याची चौकशी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी वन खात्याला त्याच जागेत आणखी एक पट्टेरी वाघ मेलेल्या अवस्थेत आढळल्याने वन खात्यात आणि एकूणच सरकारी पातळीवर खळबळ उडाली आहे.