मडगावमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खाते येणार गोत्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:11 PM2018-10-02T19:11:10+5:302018-10-02T19:11:32+5:30

जानूस गोन्साल्वीस मृतदेह गायब प्रकरणात गोवा सरकारच्या आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच आता खारेबांद - मडगाव येथील नैमुनिस्सा नारंगी या महिलेला तिच्यावर उपचार सुरु असताना आलेला मृत्यूही आरोग्य खात्याला जड पडणार आहे.

death of a woman in Madgaon, problem will rise of health department? | मडगावमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खाते येणार गोत्यात?

मडगावमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खाते येणार गोत्यात?

Next

मडगाव: जानूस गोन्साल्वीस मृतदेह गायब प्रकरणात गोवा सरकारच्या आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच आता खारेबांद - मडगाव येथील नैमुनिस्सा नारंगी या महिलेला तिच्यावर उपचार सुरु असताना आलेला मृत्यूही आरोग्य खात्याला जड पडणार आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच नैमुनिस्साचा मृत्यू झाला, असा दावा करणाऱ्या तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख आणि प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी लोकमतला ही माहिती दिली. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात हातावर शस्त्रक्रिया करताना दिलेल्या भुलीच्या औषधाची मात्रा अधिक झाल्यामुळेच या महिलेला मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला असून उद्या बुधवारी या महिलेचे कुटुंबीय आगशी पोलीस स्थानकात  तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, खारेबांद -मडगाव येथील ही 36 वर्षीय महिला मडगाव रेल्वे ट्रॅकजवळ घसरुन पडल्याने तिचा हात मोडला होता. 20 सप्टेंबरला तिला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले होते. 24 सप्टेंबरला सकाळी 10 वा. तिच्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. या महिलेचा पती दस्तगीर याने केलेल्या दाव्याप्रमाणे, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना ही महिला धडधाकट होती. मात्र ऑपरेशन करुन बाहेर आणल्यानंतर तिची प्रकृती अचानक ढासळल्याने तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय  इस्पितळात दाखल करण्यात आले होते. येथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. हे उपचार चालू असतानाच 27 सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात तिच्या कुटुंबियांना या महिलेला भेटताही आले नव्हते. सदर महिलेला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
यातील शंकास्पद बाब म्हणजे, या महिलेच्या मृतदेहाची शवचिकित्सा न करताच तो तिच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. कुटुंबियांनी शवचिकित्सेची मागणीही केली नाही. दरम्यानच्या काळात हॉस्पिसियोच्याच सुत्रांकडून शस्त्रक्रियेच्यावेळी भूल औषधाची मात्रा अधिक झाल्याने सदर महिलेची प्रकृती ढासळली अशी माहिती या कुटुंबाला मिळाली. हा सर्व प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. 
दरम्यान, सोमवारी या कुटुंबियांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची भेट घेऊन या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. कामत यांनी लगेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला. या संदर्भात कामत यांना विचारले असता, या प्रकरणातील घटनाक्रम आपण एका निवेदनाद्वारे  आरोग्यमंत्र्यांना पाठविला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आपण आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. ही चौकशी करण्याचे आश्वासन राणे यांनी आपल्याला दिल्याचे कामत यांनी सांगितले.

Web Title: death of a woman in Madgaon, problem will rise of health department?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.