सनबर्नमधील मृत्यू ड्रग्स सेवनामुळेच; गोमेकॉच्या अहवालातून झाले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:57 IST2025-01-01T07:57:22+5:302025-01-01T07:57:22+5:30
त्याच्या शरीरात मेटाफेटामाईन व एमफेटामाईन हे घातक ड्रग्स आढळले.

सनबर्नमधील मृत्यू ड्रग्स सेवनामुळेच; गोमेकॉच्या अहवालातून झाले स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये बेशुद्ध पडल्यानंतर इस्पितळात निधन झालेल्या करण कश्यपच्या शरीरात अंमली पदार्थ सापडल्याचे गोमेकॉच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्या शरीरात मेटाफेटामाईन व एमफेटामाईन हे घातक ड्रग्स आढळले.
करूण कश्यपवर केलेल्या पोस्टमार्टम अहवालात मृत्यूचे कारण राखून ठेवले असले तरी गोमेकॉत करण्यात आलेल्या स्टेट ऑफ द आर्टरेन्डॉक्स अॅनलायझर अहवालात मृत्यूचा निष्कर्ष आला आहे. त्यात त्याने ड्रग्स घेतल्याचे आढळून आले आहे. त्याच्या शरीरात विविध रासायनिक पदार्थ आढळून आले. त्यात मेटाफेटामाईन आणि एमफेटामाईन हे घातक अंमली पदार्थ आढळले आहेत. हा अहवाल गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाकडून पेडणे पोलिसांना मंगळवारी देण्यात आला आहे. शरीरात अमली पदार्थ आहे की नाही, याचा १५ मिनिटांत छडा लावण्यासाठी गोवा वैद्ययकीय महाविद्यालयात आर्ट रेन्डॉक्स अॅनलायझर हे मशीन उपलब्ध आहे.
गोमेकॉत फॉरेन्सिक मेडिसिन विभागासाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन सुविधा उपलब्ध करून देताना अत्याधुनिक 'स्टेट ऑफ द आर्टरेन्डॉक्स अॅनलायझर' मशीन आणले होते. याचा विश्लेषण अहवाल ३० मिनिटांत डिजिटल स्वरूपात मिळतो. हे मशीन तपासणीतील मानवी त्रुटीही कमी करते. या मशीनचा वापर गोमेकॉत करण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.