शिवरायांचाही पुतळा गोवा विधानसभेत हवा, भाजपा आमदाराचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:51 PM2018-02-06T19:51:09+5:302018-02-06T19:51:59+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा गोवा विधानसभेच्या क्षेत्रात उभारला जावा, अशी मागणी करणारा ठराव भाजपाचे डिचोलीतील आमदार राजेश पाटणेकर यांनी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडण्याचे ठरवले आहे

debate over Shivaji Maharaj's in Goa assembly , BJP MLA's resolution | शिवरायांचाही पुतळा गोवा विधानसभेत हवा, भाजपा आमदाराचा ठराव

शिवरायांचाही पुतळा गोवा विधानसभेत हवा, भाजपा आमदाराचा ठराव

Next

पणजी : छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा गोवा विधानसभेच्या क्षेत्रात उभारला जावा, अशी मागणी करणारा ठराव भाजपाचे डिचोलीतील आमदार राजेश पाटणेकर यांनी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडण्याचे ठरवले आहे. पाटणेकर यांनी त्याबाबतची नोटीस सरकारच्या विधिमंडळ खात्याला मंगळवारी सादर केली. राज्यात गाजणा-या पुतळा नाट्याला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

विधानसभेसमोर कुणाचाच पुतळा नको, स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा आहे तेवढा पुरे अशी भूमिका गेल्या महिन्यात भाजपाने घेतली होती. मात्र भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सुरात सुर मिसळत विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा, अशी मागणी करणारा ठराव विधिमंडळ खात्याला सादर केल्याने हा विषय आता नाट्यमय टप्प्यावर आला आहे. भाजपाचा सिक्वेरा यांच्या पुतळ्याला पाठींबा नाही. त्यामुळे भाजपा सध्या लोबोंवर नाराज आहे. पक्ष संघटनेने मुद्दाम लोबो यांच्याशी या प्रश्नी संपर्क साधला नाही. लोबो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मात्र चर्चा केली आहे. गोवा फॉरवर्डने भाजपाच्या आमदारांमधील फुट दाखवून देण्यासाठी लोबो यांचा वापर केला, अशीही चर्चा भाजपाच्या गोटात सुरू आहे.

डिचोलीचे आमदार पाटणेकर यांनी पुतळ्यांचा वाद अधिक रंगतदार बनवला आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून विधानसभेचे एक महिन्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. डिचोलीत शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि नाव्रे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धारही शिवाजींच्या हस्ते केला गेला होता.

त्यामुळे गोवा विधानसभेसमोर त्यांचाही पुतळा उभा रहायला हवा अशी आपली भूमिका असल्याचे आमदार पाटणेकर यांनी लोकमतला सांगितले. आपण खासगी ठराव सादर केला असून आपण पक्षाने व पक्षाच्या सर्व आमदारांनी आपल्याला याप्रश्नी पाठींबा द्यावा म्हणून प्रत्येकाशी चर्चा करेन. तसेच माझी भूमिका सविस्तरपणे विधानसभेतही ठरावावर बोलताना मांडणार आहे. विधानसभेसमोर भाऊसाहेब बांदोडकर वगळता अन्य कुणाचाच पुतळा नको ही भाजपची भूमिका मला तत्त्वतः मान्य आहे पण आणखी पुतळे उभे करण्याची मागणी करणारे ठराव येत असल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे हे अधिक योग्य ठरते असे आपल्याला वाटते, असे पाटणेकर म्हणाले. शिवरायांचेही योगदान गोव्याच्या मुक्तीसाठी आहे असे पाटणेकर म्हणाले.

Web Title: debate over Shivaji Maharaj's in Goa assembly , BJP MLA's resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.