ढवळी येथील भंगार आग प्रकरण: भरलेला संसार सुद्धा बेचिराख
By आप्पा बुवा | Published: May 8, 2023 11:21 PM2023-05-08T23:21:01+5:302023-05-08T23:23:11+5:30
भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली आहेत.
अजय बुवा, फोंडाः शुक्रवारी ढवळी येथील भंगार अड्ड्याला लागलेल्या भीषण आगीत भंगार अड्डा बेचिराख झालाच.स्क्रॅप यार्डात असलेला प्रत्येक नग आगीच्या भक्षस्थानी पडला.ह्या बरोबर ह्या आगीत दोन संसार सुद्धा बेचिराख झालेले आहेत. भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली आहेत.
सदर भंगार अड्ड्याच्या बाजूलाच काही भाडोत्री खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये गवंडी काम करणारी दोन कुटुंबे राहात होती. त्या दोन्ही कुटुंबात संसाराला ज्ये गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या भरलेल्या होत्या . टीव्ही, फ्रिज, सिलेंडर, गृहोपयोगी वस्तू.कपडेलत्ते,जेवणाला लागणारे किराणामाल इत्यादी इत्यादी .ज्यावेळी भीषण आग लागली त्यावेळी घरातील कर्ते पुरुष नमाज साठी मस्जिद मध्ये गेले होते. तर लहान मुले जेवायला बसणार होती. घरातील स्त्रिया जेवणाची अंतिम तयारी चालू करण्यात मग्न होती. एवढ्यातच आगेचा लोट स्क्रॅप यार्डातून त्या दोन्ही घरात घुसला. काही कळायच्या आत दोन्ही कुटुंबातील खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. एकही कागदाचा चिटोर काढण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही. घरात जेवढे सामान भरले होते ते बेचिराख झाले.पै पैसे जमवून जे काही किरकोळ दागिने करण्यात आले होते ते दागिने सुद्धा पूर्णपणे आगीत वितळून गेले. खोल्याच्या भिंती डोळ्यासमोरच पडल्या. अंगावर घातलेल्या कपड्यांवर ती दोन्ही कुटुंबीय जे बाहेर पडले ते अजून बाहेरच आहेत. आणखीन दोन-तीन दिवस त्यांना ओळखीचे व बाकीचे जेवू खाऊ घालतील. आयुष्यभर काही त्यांना कोणी पोसायच्या भानगडीत पडणार नाही.
थोडक्यात या दोन्ही कुटूंबाला पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागेल. जे काही पण जे होते ते आगीच्या भक्षस्थानी पडले. आता पुन्हा एकदा संसाराला लागणारा प्रत्येक नग मिळवावा लागेल. तो बसवावा लागेल.त्या आगीत एका व्यवसायिकाचे स्वप्न जसे भस्मसात झाले त्याचबरोबर बाजूला असणारी दोन गरीब कुटुंबे सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत.
वखार कुणाची वाट बघते?
सदर स्क्रॅप यार्डाच्या बाजूला एक लाकडाची वखार सुद्धा आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवून ठेवण्यात आले आहे. नशीब त्या दिवशी वखार वर आगीची वक्रदृष्टी पडली नाही. अन्यथा आणखीन एक मोठी आग लागली असती. आज ती आग जरी आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी अजून धूमसत आहे. उद्या वाऱ्याच्या झोक्या बरोबर एखादी चिंगारी या वखारीवर पडली तर पुन्हा एकदा आहाकार माजू शकतो. कारण बाजूलाच आणखीन काही कुटुंबे राहात आहेत. मुख्य बाब म्हणजे ज्या खोल्या येथे बांधण्यात आल्या आहेत त्या कायदेशीर असण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेव्हा प्रशासनाने वखार हलविण्यात जर अडथळे निर्माण होत असतील तर निदान त्या खोल्या संबंधित चौकशी करावी. जेणेकरून भविष्यातील आणखीन एक अनर्थ टाळता येऊ शकतो.