राष्ट्राभिमानी डॉ. फ्रासिस्को लुइस गोम्स यांचे नावेलीतील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 06:16 PM2019-09-23T18:16:31+5:302019-09-23T18:16:53+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पणजी : गोव्याचे महान सुपुत्र तथा राष्ट्राभिमानी डॉ. फ्रासिस्को लुइस गोम्स यांची येत्या ३0 रोजी १५0 वी पुण्यतिथी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पाळावी तसेच सासष्टीतील नावेली येथील त्यांचे पुरातन घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, त्यानी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचे गठन करुन कला व संस्कृती खात्यातर्फे त्याचे प्रकाशन करावे, त्यांच्यावर इंग्रजी व कोंकणी भाषेतून जीवनपट काढावा, नावेली येथे त्यांच्या नावे सरकारने राजकीय अर्थव्यवस्था या विषयावर अभ्यास केंद्र सुरू करावे आदी मागण्या प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, ‘१९ व्या शतकात डॉ. फ्रांसिस्को लुईस गोम्स यांची ख्याती जगभर झाली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. येत्या ३0 रोजी सरकारी पातळीवर त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करुन पुण्यतिथी पाळावी.
सासष्टी तालुक्यातील नावेली गावात ३१ मे १८२९ साली जन्मलेल्या या महान गोमंतकीयाने भौतिकशास्र, वक्तृत्त्च, राजकारण, समाजकारण, इतिहास, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी केली आहे. ते विव्दान होते. कोकणी व्याकरण लिहिण्याचे काम त्यानी त्या वेळी केले होते.
वयाच्या अवघ्या ४0 व्या वर्षी निधन झालेले गोवा पारतंत्र्यात असताना गोम्स यांनी पोतुर्गालच्या संसदेत गोव्याचे प्रतिनिधीत्त्व करुन भारताच्या स्वातंत्र्यासाठी मागणी केली होती. एका पत्रात त्यानी ‘मी ‘महाभारत’ घडले आणि जेथे बुद्धिबळाचा शोध लागला तेथे जन्माला आलो’ असे लिहून पत्राच्या शेवटी ‘भारताचे स्वातंत्र्याच्या प्रकाश बघण्याची मी मागणी करतोय’ असे लिहून त्या काळात आपले प्रखर राष्ट्रप्रेम दाखवले होते. नवीन पिढीला ही जाणीव करुन देण्याची गरज आहे.