'दूधसागर' च्या पाणी पातळीत घट; तिसवाडी व फोंडा तालुक्यावर जलसंकटाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:04 AM2023-04-07T09:04:44+5:302023-04-07T09:05:40+5:30
फोंडा तालुक्याबरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष सोसावे लागणार आहे.
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : संपूर्ण तिसवाडी व फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमालीची खाली आली असून, आठ दिवसांत १३ पैकी तीन बंधारे सोडण्यात आले आहेत. असे असतानाही पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. पातळी वाढली नाही तर संपूर्ण फोंडा तालुक्याबरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष सोसावे लागणार आहे.
ओपा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्प ठिकाणची पाणी पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची बरीच खाली गेली आहे. गेल्या दहा दिवसांपासून कुळे परिसरातील दोन बंधारे खुले करण्यात आले होते. गुरुवारी आणखीन एक बंधारा खुला करण्यात आला आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलस्रोत तसेच बांधकाम खात्याचे अभियंते कसोशीने प्रयत्न करत आहेत.
ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये चार मीटर पाणी असणे गरजेचे असते. सध्या या पाण्याची पातळी २.७० मीटर असून ती २.४० मीटरपर्यंत खाली आल्यानंतर फोंडा व तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी २०२० मध्ये ओपा प्रकल्पाला पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जलस्रोत खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील विविध खाणीचे पाणी दूधसागर नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे दूधसागर नदीची पातळी राखली जाईल. त्यावेळी सदर प्रयोग यशस्वी ठरला होता यावेळीसुद्धा पाण्याची पातळी राखण्याकरता व दोन्ही महत्त्वाच्या तालुक्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्याकरता खनिज खंदकातील पाणी पुन्हा एकदा दूधसागर नदीत सोडण्याची प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी लागेल. यासंदर्भात जलस्रोत खात्याचे अभियंतेही प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.
पाणी नेमके जाते कुठे?
फोंड्यात नदी, ओहोळ, नाल्यांची काही कमी नाही. धारबांदोडा तालुक्यात नदीवर छोटासा पाणीप्रक्रिया प्रकल्प राबवून पाणीपुरवठा होत आहे. तीच पद्धत कुठेतरी फोंडा तालुक्यातील नदीवरही राबविण्याची वेळ आलेली आहे. मुबलक पाणीसाठा असतानाही दूधसागर नदीच्या पात्रात मात्र का कमी पाणी मिळते याची शहनशा व्हायला हवी. पूर्वीसारखे सगळे नाले व ओहोळ नदीला मिळाले तर दूधसागर नदीचे पाणी कधीच कमी होणार नाही. परंतु आज काही ठिकाणी नदी व ओहळाचे पाणी अडवण्यात आल्याचे सरास आढळून येत आहे. खांडेपार येथे तर अशी चर्चा आहे की खांडेपार ओहोळाचे पाणी अडवून ते चक्क टँकरमध्ये भरण्यात येत आहे. ही बाब जर खरी असेल तर पाणी विभागाच्या अभियंतांनी तिथे जाऊन त्या संपूर्ण ओव्हाळाची पाहणी करायला हवी. नेमके पाणी कोण अडवतो? याची माहिती घ्यायला हवी.
पावसाच्या आगमनाकडे लक्ष
ज्या तऱ्हेने तापमान वाढलेले आहे ते पाहता त्याचे परिणाम नदीवरही होऊ शकतात. नदी आटण्याचे प्रमाण जोर धरू शकते. तेव्हा ठीक ठिकाणी लहानसहान बंधारे घालून पाणी अडविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओहोळ व नाल्यातले पाणी नदीत सोडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यामुळे सर्वांचे पावसाकडे लक्ष आहे.
दूधसागर नदीच्या पाण्याचे पातळी कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. जलस्त्रोत खात्याने कुळे परिसरातील बंधारेही खुले केले आहेत. पाण्याची पातळी अशीच जर खाली येत राहिल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यंदा पाऊस तुलनेने तसा कमीच पडला आहे. नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. - जयंत प्रभू सहायक अभियंता, ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"