दीन दयाळ स्वास्थ्य योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 07:58 PM2016-09-01T19:58:37+5:302016-09-01T19:58:37+5:30
दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचा गुरुवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आरोग्यमंत्री फ्रान्सिस्क डिसोझा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 1 - दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचा गुरुवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आरोग्यमंत्री फ्रान्सिस्क डिसोझा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ४४७ उपचार प्रक्रियांचा समावेश असलेल्या या योजनेअंतर्ग आतापर्यंत १.६० कुटुंबांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे. या विमा योजनेसाठी राज्यातील १९ इस्पितळांना सहभागी करून घेण्यात आले आहे. सरकारी नोकरांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी ३१ मार्च नंतर समजोता करारात दुरुस्ती केल्या जाणार आहेत.
सरकारी सेवकांना वैद्यकीय खर्चाचा अमर्याद परतावा मिळण्याची सोय असल्यामुळे त्यांचा या योजनेसाठी विचार करण्यात आला नव्हता. परंतु ४ लाखापेक्षा कमी खर्चाच्या बाबतीत यापुढे त्यांचाही विचार केला जाणार आहे. ३१ मार्च नंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल. त्यावेळी ही योजना सरकारी सेवकांसाठीही खुली केली जाईल. त्याचबरोबर इतर काही त्रुटी लक्षात आल्यास त्याचीही दखल घेतली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील टाटा मेमोरिएल इस्पितळालाही या योजनेअंतर्गत संलग्न करून घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगासारख्या गंभीर रोगावरील उपचारासाठी गोव्यात आँकोलोजीस्ट नाहीत. परंतु त्यामुळे गोव्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हे प्रयत्न आहेत. काही दिवसात ते पूर्णही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.