दीनदयाळ विमा योजना मार्गी
By admin | Published: August 11, 2015 01:54 AM2015-08-11T01:54:07+5:302015-08-11T01:54:07+5:30
पणजी : दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना चालू वर्षाच्या आतच मार्गी लागेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
पणजी : दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना चालू वर्षाच्या आतच मार्गी लागेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. या योजनेवर चर्चा विनिमयासाठी ४० ते ५० बैठका आजवर झालेल्या आहेत. योजना आदर्श अशीच बनविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत गरजवंतांना मेडिक्लेमचा लाभ आम्ही देत आहोत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
म्हापसा व फोंडा येथील सरकारी इस्पितळांमध्ये डायलिसीस युनिट सुरू केले जाईल. परिचारिका, लॅब टेक्निशियन्स, सर्व्हंट आदी मिळून २६१ पदे महिनाभरात भरली जातील. बांबोळी येथे मुलीच्या वसतिगृहाचे तसेच लेक्चर हॉलचे उद्घाटन येत्या १५ आॅगस्ट रोजी केले जाईल. अशा महत्त्वाच्या घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केल्या. आॅडिटोरियमचे काम आॅक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण होईल.
गोमेकॉत एमबीबीएसच्या १५० जागा कायम राहतील. एमसीआयने या जागांना कधीही नकार दिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोमेकॉत ४५ परिचारिकांची भरती केली जाईल. ५५७ पैकी १५० परिचारिका बाल संगोपनाच्या दीर्घ रजेवर असल्याचे ते म्हणाले.
गोमेकॉत गरजूंना मोफत औषधांची सोय आहे. २४ कोटी ९८ लाख रुपये त्यासाठी मंजूरही झालेले असून निविदा काढून औषधे आलेली
आहेत.
रुग्णांना बाहेरून ती खरेदी करण्याची सक्ती केली जात असेल तर त्याची चौकशी होईल, अशी हमी डिसोझा यांनी दिली.
तत्पूर्वी आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवर कपात सूचना मांडताना विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. दांडो, सांगे येथे दुचाकी अपघातात एका महिलेने आपल्या डोळ्यादेखत प्राण सोडले. रुग्णवाहिका वेळेत आलीच नाही. नेत्रावळी येथे रुग्णवाहिका होती. इस्पितळ सांगेत असताना रुग्णवाहिका इतक्या लांब का, असा सवाल त्यांनी केला. या महिलेला आपण वाचवू शकलो नाही याबद्दल आपल्याला अपराधी वाटते, असे ते म्हणाले.
आमदार विश्वजित राणे यांनी अर्ध्याहून अधिक १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणले.
(प्रतिनिधी)