नावेली ओहोळात बुडालेल्या दीपकचा मृतदेह 24 तासानंतर सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 06:43 PM2019-07-16T18:43:48+5:302019-07-16T18:44:02+5:30
शोधकार्य करणा-यांनी हा कचरा साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर या झाडीत अडकून राहिलेला मृतदेह सापडला.
मडगाव - मडगावपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरी-नावेली येथे सोमवारी सायंकाळी पावसाने भरलेल्या ओहोळात बुडालेल्या दीपक खत्री या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर मांडप पुलाजवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सापडला.
ज्या ओहोळात तो बुडला होता त्या ओहोळात मोठ्या प्रमाणावर झाडी असून, त्यात प्लास्टिक कचरा अडकून पडला होता. शोधकार्य करणा-यांनी हा कचरा साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर या झाडीत अडकून राहिलेला त्याचा मृतदेह सापडला.
ही दुर्घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती. सोमवारी रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या बोटमधून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात यश न आल्यामुळे मंगळवारी सकाळी नौदलाच्या डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. एकूण सहा डायव्हर्स या शोधकामात सामील झाले होते. त्यानंतर सायंकाळी सांगेतील खासगी डायव्हर फ्रान्सिस्को बरेटो हाही शोधकार्यात सामील झाला होता. त्याशिवाय स्थानिकांनीही या शोधकार्यात भाग घेतला होता.
याच ओहोळाच्या काठावर रहाणारा दीपक व त्याचे अन्य मित्र ओहोळाच्या काठी सायकल चालवत असताना सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. रविवारी रात्री पडलेल्या संततधार पावसामुळे हा ओहोळ भरून वाहत होता. ही दुर्घटना घडल्यानंतर सुमारे तासभराने त्या मुलांनी ही खबर बाकीच्याना दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचा पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने त्वरित शोधकार्यास सुरुवात केली मात्र त्याची सायकल पाण्यात सापडली मात्र तो सापडू शकला नव्हता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी स्थानिक आमदार लुईझिन फालेरो यांनी घटनास्थळावर धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर स्वत:ही त्यांच्या बोटवर चढून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळीही ते घटनास्थळी हजर होते अशी माहिती मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी दिली.