काही धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण गोव्यात पराभव: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2024 10:23 AM2024-06-05T10:23:10+5:302024-06-05T10:23:57+5:30
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी लढत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काही धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण गोव्यात भाजपला पराभव पत्करावा लागल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून, तो आम्ही स्वीकारल्याचे सावंत यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघांत आम्हाला अपेक्षित आघाडी मिळाली. पल्लवी धेपे यांचा पराभव झाला असला तरी भाजपची मते वाढून ४५.२६ टक्क्यांवर पोचली आहेत. पराभवाबद्दल कोणालाही दोष देता येणार नाही. काही गोष्टींवर आम्ही निश्चितपणे विचारमंथन करणार आहोत.
मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर गोवा मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले आहे. भाजपला या मतदारसंघात ५६ टक्के मते मिळाली आहेत. केंद्रातही भाजपची सत्ता येणार असल्याने पुन्हा डबल इंजिन सरकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे विकासकामे गतीने होतील. दक्षिणेतील पराभवामुळे आम्ही स्वस्थ बसणार नाही. २०२७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशीच आमची लढत होईल.
तीन ठिकाणी आघाडी
उत्तर गोव्यात भाजपने काँग्रेसवर १.१३ लाख मतांहून अधिक मताधिक्याने मिळविलेल्या यशात साखळी, डिचोली, मये, वाळपई आणि पर्ये मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. तर काँग्रेसला कळंगुट, हळदोणे आणि सांताक्रूझ मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. हळदोणे, सांताक्रूझ आणि कळंगूट या तीन विधानसभा मतदारसंघापैकी केवळ हळदोणा मतदारसंघातच काँग्रेसचा आमदार आहे. तर इतर दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. ९६३२ मते मिळालेल्या काँग्रेसला हळदोण्यात ८० मतांची निसटती आघाडी मिळाली आहे. १०६८८ मते घेऊन सांताक्रूजमध्ये २२२६ मतांची तर कळगुमध्ये ९६३९ मतांसह २१५७ मतांची आघाडी मिळाली आहे.
पर्येत भाऊंना १९,९५८ मताधिक्य; राणेंचे आभार
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानायडे म्हणाले की, जनतेचा कौल स्वीकारून आम्ही जनतेबरोबरच मंत्री, आमदार, कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानत आहोत. उत्तर गोव्यात पर्ये मतदारसंघात श्रीपाद यांना सर्वाधिक १९,९५८ मतांची लीड दिल्याबद्दल आमदार दिव्या राणे यांचे आभार. मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रचारासाठी इतर ठिकाणी व्यस्त राहिले तरी साखळीत १५,७६४ मतांची आघाडी श्रीपादना मिळाली. त्याबद्दल तानावडे यांनी त्यांचेही आभार मानले. वाळपईत १३.००५ मतांचे लीड मिळाल्याने मंत्री विश्वजीत राणे यांचे आभार मानले.
हा विजय म्हणजे दक्षिण गोव्यातील जनतेचा आहे. आमच्याविरुद्ध सर्व सरकारी यंत्रणा राबविली गेली. पक्षाचे खातेही सील करण्यात आले होते. तरीही जनता आमच्या पाठीमागे उभी राहिली. मोदींचा करिश्मा असे चित्र रंगविण्यात आले होते. मात्र, लोकांनी त्याला थारा दिला नाही. -अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.