पराभूत सिझर अन् त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:45 PM2018-11-06T22:45:54+5:302018-11-06T22:50:00+5:30
तुमच्या राजकीय धारणा कोणत्याही असोत, एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. आपण आपल्या जीवनातले सर्वाधिक किळसवाणे नाट्य तूर्तास अनुभवतो आहोत.
- डॉ. ऑस्कर रिबेलो
तुमच्या राजकीय धारणा कोणत्याही असोत, एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. आपण आपल्या जीवनातले सर्वाधिक किळसवाणे नाट्य तूर्तास अनुभवतो आहोत. एक व्याधीग्रस्त राजा, संविधानाच्या तोंडात मारणारी प्रशासकीय व्यवस्था, अस्तनीतल्या निखा-यांची जळजळीत सत्ताकांक्षा, वास्तवापासून विलग असलेली आणि समोर आलेला राजकीय चिखल कुठल्यातरी अंधारात ढकलत स्वच्छतेचा डिंडीम मिरवणारी महाराणी, ही या नाट्यातली पात्रे. कुणाला वाटेल हे विनोदी प्रहसन आहे; पण नाही, मित्रांनो, तुम्ही-आम्ही विनोदाचा विषय बनलो आहोत.
आणि उर्वरित जगाने आपल्याकडे पाहात हसणेही सोडून दिलेय. गोव्याला त्यांनी भंगारातच काढलेय. या नरकवासाकडल्या प्रवासासाठी मी मात्र केवळ मनोहर पर्रीकर यांना जबाबदार धरेन. कॅन्सर निर्दय हत्यारा असतो. त्याच्या भक्ष्यस्थानी कधी कोण पडेल, हे सांगणे कठीण. ज्याला तो जडतो त्याच्या शारीरिक आणि मानसिक वेदना तसेच त्याच्या निकटवर्तीयांना होणा-या यातना अवर्णनीय असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर मनोहर पर्रीकरांना उद्देशून टाकलेले कुत्सित आणि तिरस्कारयुक्त पोस्ट केवळ त्यांनाच लक्ष्य करत नाहीत तर प्रत्येक कॅन्सरग्रस्ताला नामोहरम करतात. सत्ताकांक्षा राजकारण्यांचे अध:पतन घडवत असते, हे खरे असले तरी आपणही माणुसकी विसरण्याची काहीच आवश्यकता नाही.
एवढे सांगितल्यानंतर आता हेही सांगायला हवे की मनोहर पर्रीकर आणि त्यांच्याभोवती वावरणा-यांनी लोकशाही तत्त्वांना पायदळी तुडवणा-या काही अनाकलनीय कृती केल्या आहेत. असाध्य आजाराचे निदान होऊनही पर्रीकर शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कष्टाची कामे करताहेत. सत्तेपासून दूर होण्याचे त्यांना सुचलेलेही नाही. याचाच अर्थ वटवृक्षाखालील रोपांची वाढ जशी खुंटते तद्वतच त्यांच्या पक्षात त्यांची जागा घेणारी दुसरी फळीच तयार झालेली नाही. अशी परिस्थिती उद्भवताना वटवृक्षाचे माहात्म्य नव्हे तर त्याच्या मर्यादाच दिसून येतात. गोव्याच्या भविष्याविषयीची तळमळ आणि साधनसुविधांच्या विकासाविषयी आस्था असूनदेखील पर्रीकर आजवर एखादा शाश्वत कायदा - मग तो पर्यावरणविषयक असो, शिक्षणविषयक असो किंवा स्वयंपोषक आर्थिक विकासाचा असो- करण्यास कारणीभूत ठरलेले नाहीत. जे घडलेय ते परिस्थितीवश घडलेय, राजकीय निकड म्हणून घडलेय. पर्रीकरांच्या कारकिर्दीत भाजपचे काँग्रेसीकरण झाले.
केडरचा झालेला तेजोभंग पक्षाला महागात पडू शकतो. भविष्यात सुभाष वेलिंगकरांच्या मागून भाजप आणि मगोपचे कार्यकर्ते गेल्यास आश्चर्य वाटू नये. पत्त्यांचा बंगला उभा करण्यास वर्षे जातात आणि एखाद्याच घोडचुकीने तो क्षणार्धात जमीनदोस्त होत असतो.
जर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पर्रीकरांनी आपल्या आरोग्याविषयीचे सत्य स्वीकारून जनतेला टेलीव्हिजनवरून संबोधन करीत त्याची कल्पना दिली असती आणि राज्याच्या भविष्याविषयीच्या आपल्या योजना विषद केल्या असत्या तर लोकशाहीचे अपहरण करत सरकार स्थापण्याच्या त्यांच्या कृतीलाही गोमंतकीयांनी माफ केले असते. तेवढा प्रांजळपणा पर्रीकरांनी दाखविला नाही. सगळ्यात मोठा प्रमाद कोणता असेल तर विरोधी पक्ष नेता असतानाच्या आपल्या हितचिंतकांना विसरण्याची त्यांची कृती. यात सुभाष वेलिंगकर आणि क्लॉड अल्वारीस यांच्यासह अन्य असंख्यांचा समावेश आहे. असे करताना त्यांनी आपल्या राजकीय शत्रूंना मात्र कवेत घेतले. त्यांनीही यांना सत्तेच्या लालसेने मिठी मारली आणि यांनीही ती मगरमिठी चालवून घेतली. आता जो नाटय़ाचा प्रवेश शिल्लक आहे, त्यात दिसतोय एक नैतिकदृष्टय़ा पराभूत झालेला सिझर आणि त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स.
(लेखक गोव्यातील सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत.)