गोव्यात होणाऱ्या ५५व्या इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:38 PM2024-10-04T17:38:24+5:302024-10-04T17:42:16+5:30
इफ्फी जागतिक पातळीवरील प्रतिनिधींची नोंदणी होत असते. ही प्रतिनिधी नोंदणी दोन महिने अगोदर सुरू केली जाते.
पणजी : राज्यात २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे आठ दिवस होणाऱ्या ५५ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. देश-विदेशातील प्रतिनिधींसाठी ही नोंदणी खुली असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इफ्फी २०२४ गुगलवर ही नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.
इफ्फीला आता फक्त दीड महिना असल्याने, आतापासून या महोत्सवाच्या कामाला सुरुवात होणार आहे. इफ्फी जागतिक पातळीवरील प्रतिनिधींची नोंदणी होत असते. ही प्रतिनिधी नोंदणी दोन महिने अगोदर सुरू केली जाते. त्यामुळे महोत्सवात मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असते. ही प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया आता पूर्ण दीड महिना सुरू असणार आहे, तसेच ज्या प्रतिनिधींना एक दिवसीय पास हवा असेल, तर त्यांच्यासाठी खास गोवा मनोरंजन संस्थाच्या बाहेर दालने घालून प्रतिनिधी पास उपलब्ध करून दिला जातो.
राज्यात माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकरांनी २००४ मध्ये इफ्फी गोव्यात आणला. त्यानंतर, आता इफ्फी कायमस्वरूपी महोत्सव झाला आहे. आता राज्यात २० वर्षे हा महोत्सव साजरा होत आहे. गोवा मनोरंजन संस्था, कलाअकादमी, तसेच ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात अशा विविध ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन होत आहे.
यात देश विदेशातील सिनेकलाकार, दिग्दर्शक, निर्माते हजेरी लावतात, तसेच चित्रपटाविषयी आवड असलेले, तसेच चित्रपटाचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी या महोत्सवात येत असतात. या महोत्सवात देशभराबरोबर जगभरातील विविध भाषांचे चित्रपट दाखविले जातात. यात राज्यातील स्थानिक कलाकारांची कोकणी मराठी चित्रपटांनाही संधी मिळते.