काँग्रेसच्या आमदारांचा युतीसाठी दिल्लीत तळ
By admin | Published: January 5, 2017 02:03 AM2017-01-05T02:03:29+5:302017-01-05T02:03:45+5:30
पणजी : काँग्रेसच्या सर्व आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला असून येत्या निवडणुकीवेळी काँग्रेसने भाजपविरुद्धच्या अन्य पक्षांसोबत
पणजी : काँग्रेसच्या सर्व आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला असून येत्या निवडणुकीवेळी काँग्रेसने भाजपविरुद्धच्या अन्य पक्षांसोबत युती करावी, अशी भूमिका पाच आमदारांनी व विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनीही बुधवारी वेणुगोपाल समितीकडे व दिग्विजय सिंग यांच्याकडे मांडली आहे. काँग्रेसने काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत.
खासदार वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार निवडीसाठी काँग्रेसची छाननी समिती कार्यरत आहे. या समितीची बुधवारी सायंकाळी दिल्लीत तीन तास बैठक झाली. गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी या समितीने उमेदवार तत्त्वत: निश्चित केले. येत्या ९ रोजी दुसरी बैठक होणार असून त्या वेळी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मये, कळंगुट, मांद्रे, कुडचडे, नुवे, कुंकळ्ळी, वेळ्ळी अशा काही मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरले आहेत. फक्त नावे नंतर जाहीर केली जातील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
दिगंबर कामत, राणे, बाबू कवळेकर, विश्वजित राणे, आलेक्स रेजिनाल्ड
लॉरेन्स व जेनिफर मोन्सेरात यांनी बुधवारी वेणुगोपाल यांची भेट घेतली व सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने अन्य पक्षांसोबत युती करणे गरजेचे आहे, असा मुद्दा मांडला. दिग्विजय सिंग यांच्याशीही आमदारांनी त्याचप्रकारे चर्चा केली. (खास प्रतिनिधी)