केजरीवाल प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीला; न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश
By काशिराम म्हांबरे | Published: November 29, 2023 01:19 PM2023-11-29T13:19:39+5:302023-11-29T13:20:05+5:30
केजरीवाल यांच्या वतिने अॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात त्यांच्या वतिने बाजू मांडली.
म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आज २९ रोजी न्यायालयात हजर राहण्यापासून न्यायालयाकडून सूट देण्यात आली. ५ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणी दरम्यान त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज झालेल्या सुनावणी वेळी देण्यात आले आहेत.
केजरीवाल यांच्या वतिने अॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात त्यांच्या वतिने बाजू मांडली. आज झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांना १० हजार रुपयांची हमी न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी कायदेशीरबाबीवर सध्या विचार विनीमय सुरु असून त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयातही आवाहन दिले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांना पाठवलेला समन्स कालच त्यांना मिळाला होता पण समन्य उशीराने प्राप्त झाल्याने ते स्वत: उपस्थित राहू शकले नाही अशी माहिती तिळवी यांनी दिली.
२०१७ साली निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना काल मंगळवारी समन्स बजावला होता. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १७१(अ) अंतर्गत आज सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रचारा दरम्यान येथील टॅक्सी स्थानकावर केजरीवाल यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणातून मतदारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मतांच्या बदल्यात पैसे स्वीकारणे मात्र मतदान फक्त आपल्याच पक्षाला देण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात त्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकाºयाने त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती.