दिल्लीच्या पर्यटकाचा कोलव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 07:48 PM2018-11-28T19:48:43+5:302018-11-28T19:49:45+5:30
मोठ्या लाटांनी आत ओढल्यानं पर्यटकाचा मृत्यू
मडगाव: गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या अमित सेनगुप्ता या 60 वर्षीय दिल्लीच्या पर्यटकाला बुधवारी दुपारी कोलवा समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. किनाऱ्यावरील जीव रक्षकांनी त्यांना पाण्यातून वर काढले. मात्र त्याचा जीव ते वाचवू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, सदर पर्यटक दुपारच्यावेळी आपल्या पत्नीसह समुद्रात उतरला होता. किनाऱ्यापासून जरा पुढे गेल्यानंतर एका मोठ्या लाटेने त्यांना आत ओढून नेल्याचे पाहिल्यावर त्याच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली असता, किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेऊन या पर्यटकाला तडीवर आणले. त्याची स्थिती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र या उपचाराना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
सायंकाळी हा मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणण्यात आला. मात्र दुसऱ्या सत्रात हॉस्पिसियोचे शवचिकित्सक नसल्याने ही चिकित्सा होऊ शकली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. त्यामुळे गुरुवारी सकाळी शवचिकित्सा ठेवण्यात आली आहे. हॉस्पिसियो इस्पितळात पूर्णवेळ शवचिकित्सकाची नेमणूक न केल्याने गोमेकॉतील शवचिकित्सक मडगावात येऊन चिकित्सा करतात अशी माहिती हाती लागली असून त्यामुळेच कित्येकवेळा त्यात दिरंगाई होते अशीही माहिती प्राप्त झाली आहे.