दिल्लीच्या वीज मॉडेलची गोव्यात चर्चा रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 06:19 PM2020-11-25T18:19:55+5:302020-11-25T18:20:13+5:30
दिल्लीचे केजरीवाल वीज मोडेल व गोव्यातील भाजपचे वीज मोडेल याविषयी तुलनात्मक चर्चा करूया असे आव्हान वाल्मिकी यांनी दिले होते.
पणजी : राज्यातील लोकांना स्वस्त आणि विश्वासार्ह अशा वीजेचा पुरवठा करण्यात गोवा सरकारला अपयश येत आहे अशा अर्थाचा सूर बुधवारी चर्चात्मक कार्यक्रमात व्यक्त झाला. वीजमंत्री निलेश काब्राल व आपचे नेते वाल्मिकी नायक यांच्यात चर्चा रंगली.
दिल्लीचे केजरीवाल वीज मोडेल व गोव्यातील भाजपचे वीज मोडेल याविषयी तुलनात्मक चर्चा करूया असे आव्हान वाल्मिकी यांनी दिले होते. मंत्री काब्राल यांनी ते स्वीकारले आणि युक्तीवादांचे द्वंद वीजेच्या गतीने पुढे जात राहिले. दिल्ली सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही व त्यामुळे दिल्लीतील लोकांना स्वस्त दरात वीज देणे केजरीवाल सरकारला शक्य होते. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत दोनशे युनीटपर्यंत वीज मोफतच आहे, असे वाल्मिकी म्हणाले. वाल्मिकी यांनी दिल्लीतील व गोव्यातील काही वीज बिलेही सादर केली व तफावत मांडण्याचा प्रयत्न केला. मंत्री काब्राल यांनी प्रत्युत्तर दिले. जी वीज मोफत म्हणून दिल्लीत सांगितली जाते, ती प्रत्यक्षात मोफत नाही, कारण वीज ग्राहकाला जे बिल पाठवले जाते, ते शंभरक टक्के बिलाचेच असते. फक्त त्यातील पन्नास टक्के केजरीवाल सरकार भरते. हा पैसाही लोकांचाच आहे, असे काब्राल म्हणाले.
तुम्ही अशाच पद्धतीने गोव्यात करा व प्रमोद सावंत सरकारला लोकांचे पन्नास टक्के वीज बिल भरायला सांगा, असे वाल्मिकी यांनी सूचविले. गोवा सरकार लोकांना विश्वासार्ह वीज देत नाही व त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला घरात किंवा कार्यालयात इनवर्टर बसवावा लागतो. व्यवसायिकांना जनरेटर बसवावे लागतात, असे वाल्मिकी म्हणाले. विश्वा सार्ह म्हणजे अखंडीत अशी वीज चोवीस तास देता येत नाही हे काब्राल यांनी मान्य केले. मात्र यासाठी आपण जबाबदार नव्हे. येथे वीज क्षेत्रात आवश्यक त्या पायाभूत सुविधा नाहीत. आपण वीज मंत्री होऊन जास्त काळ झालेला नाही, आपण साधनसुविधा उभ्या करत आहे. पुढील काळात प्रीपेड वीज बिल पद्धतही गोव्यात येईल, असे काब्राल यांनी सांगितले. गोवा सरकार वीज खाते फायद्यासाठी चालवत नाही. दिल्लीत वीज खाते आऊटसोर्स केले गेले आहे. चार कंपन्या ते चालवतात व त्या चारही कंपन्या नफा कमावतात. वीज थोडी स्वस्त देण्यासाठी दिल्लीत तेथील सरकारने एक योजना आणली व त्या योजनेची कार्यवाही सरकार करत आहे. आम्ही गोव्यात गृह आधार, लाडली लक्ष्मी अशा योजना आणल्या, त्याच धर्तीवर दिल्लीत वीज क्षेत्रात योजना आणली गेली, असे काब्राल म्हणाले. यावेळी वाल्मिकी यांनी समाज कल्याणाच्या अनेक मोठ्या व चांगल्या योजना दिल्ली सरकारही राबवते असे सांगत यादी सादर केली. दिल्लीत सरकारने लोकांना कोविड मोफत दिला, असा शेरा काब्राल यांनी मारत
चर्चेला आक्रमकतेचा करंट देण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाल्मिकींनीही गुगली टाकली. तुम्ही तेरा काँग्रेस आमदार भाजपमध्ये मोफत आणले की विकत आणले अशी विचारणा वाल्मिकींनी करत काब्रालांचा फ्युज काढला. ते फुकट आले की नाही याची चौकशी तुम्ही करून घ्या असे काब्रालांनी वाल्मिकींना सूचविले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून पत्रकार प्रमोद आचार्य यांनी काम पाहिले.